पुणे: गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसरातून अमली पदार्थाची तस्करी करणार्या विदेशी नागरिकाला पकडले. त्याच्या ताब्यातून तब्बल ३० लाख ४० हजार रुपये किमतीचे १५२ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. हसेनी मुबीनी मीचॉगा (३५, मु. रा. टांझानिया) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली की, एक परदेशी नागरिक कोंढवा परिसरात उंड्री येथे सार्वजनिक रस्त्यावर कोकेन विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित परदेशी इसमाला ताब्यात घेतले. आरोपी हा मुळचा टाझांनिया येथील रहिवासी असून कामानिमित्ताने भारतात आला. उंड्री याठिकाणी तो सध्या राहत होता. परंतु अंमली पदार्थ विक्री करताना तो पोलिसांना मिळून आला आहे. पोलिसांनी आरोपीवर कोंढवा पोलिस ठाण्यात एनडीपीसी कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी दिली.
साडेचार लाखांचे मेफेड्रॉन जप्त...
विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके आणि अंमली पदार्थ विरोधी पथक २ हे विश्रांतवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस हवालदार चेतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण लोहगाव धानोरी रस्त्यावर मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी किसन नंदकिशोर लधार (३४, रा. लोहगाव, मु. रा. राजस्थान) या आरोपीला अटक केली. त्याच्या ताब्यातून चार लाख ४० हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम मेफेड्रॉन व दहा हजाराचा एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडीच लाखांचा गांजा हस्तगत..
वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस गस्त घालताना पोलिस हवालदार रवींद्र रोकडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एम्प्रेस गार्डन गेट समोर घोरपडी येथे सार्वजनिक रस्त्यावर गांजा हा अंमली पदार्थ विक्री करताना ओंकार अनिल चंडालिया (२१, रा. उरळी कांचन) या पकडले. त्याच्या ताब्यातून दोन लाख ४० हजार रुपये किमतीचा ९ किलो गांजा, एक मोबाईल व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.