इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. यातील तीन कचरवाडी, जाधववाडी, जाचकवस्ती ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ५७ ग्रामपंचायतींसाठी मागील दोन दिवसांत पक्षप्रमुखांनी आपापले उमेदवार फिक्स करून प्रचाराचे नारळ फोडले आणि प्रचाराला जोरात सुरुवात केली आहे. खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली असून, गावोगावी ग्रामदैवताचे दर्शन घेऊन प्रचाराला वेग आणला आहे. त्यामुळे गावागावांत राजकीय वातावरण तापले असून पाच दिवस उमेदवारांना जागते रहोची परीक्षा द्यावी लागणार आहे. गावोगावी उमेदवारासह कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत. १५ जानेवारीला मतदान होणार असून तीन दिवसांनी १८ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी मकरसंक्रांतीचा सण असल्याने तिळगूळ घ्या, गोड गोड बोला हा उपक्रम उमेदवारांकडून मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात राबविला जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीमध्ये परिवर्तन आणि ग्रामविकास अशी चुरशीची नावे पॅनलप्रमुखांनी ठेवली असून सोशल मीडियात प्रचाराला वेग आला आहे.
प्रचाराचा नारळ फुटला, भेटीगाठीला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:08 AM