पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी घोषित केलेले उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या विरोधात करण्यात आलेली आचारसंहिता भंग तक्रारी चौकशी करून अखेर निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीने शिरूरसाठी डॉ कोल्हे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांनी प्रचारही सुरु केला आहे. सध्या कोल्हे यांची ''स्वराज्य रक्षक संभाजी'' नावाची मालिकाही सुरु आहे. त्यामुळे त्याद्वारे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र कोल्हे यांना उमेदवार घोषित केले असले तरी प्रत्यक्षात त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही त्यामुळे ते उमेदवार आहेत असे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत. याच कारणामुळे ही तक्रार काढून टाकण्यात आली आहे.
अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी लोकमतला सांगितले की, कोल्हे यांच्या विरोधात तक्रार आली आहे.मात्र कोल्हे यांनी अजूनही अर्ज न भरल्याने ते उमेदवार आहेत असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. त्यांनी अर्ज भरल्यानंतर अशा प्रकारची तक्रार आल्यास त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे सध्या दाखल केलेली तक्रार निकाली काढली आहे.