पुणे : कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसच्या मिटिंग्ससाठी कॉफीशॉप ही नेहमीच पहिली निवड असते. कॉलेज बंक करून थेट कॉफी शॉपमध्ये जाणारे किंवा ऑफिसची महत्त्वाची मिटींग कॉफी शॉपमध्ये अरेंज करणारे अनेक आहेत. म्हणजेच काय तर तरुण आणि वयस्क लोकच या कॉफी शॉपमध्ये जातात. मात्र लहान मुलांसाठीही एक खास कॉफी शॉप आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं तर नवल वाटायला नको. कारण, पुण्यात बच्चेकंपनीसाठी बनवण्यात आलेलं एक कॉफी शॉप आहे. जिथं तुमची मुलं केवळ खवय्येगिरीच करणार नाहीत तर आपल्या ज्ञानभंडाराचीही वाढ करू शकता.
खाद्यविषयक लेखांसाठी येथे क्लिक करा.
पुण्याच्या विमान नगर येथील फिऑनिक्स मार्केट सिटीच्या तळमजल्यावरच 212 ज्यूनिअर हे कॉफी शॉप आहे. हे कॉफी शॉप खास बच्चेकंपनीसाठी राखीव आहे. या कॉफी शॉपमध्ये शिरताच आजूबाजूचं डेकोरेशन तुमचं लक्ष वेधून घेईल. बसण्याची व्यवस्थाही आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे. मुलं जेव्हा गोष्टीची पुस्तकं वाचण्यात, गेम खेळण्यात किंवा चित्र रंगवण्यात व्यस्त असतील तेव्हा पालकही त्यांचं एखादं आवडतं पुस्तक वाचू शकतील अशीही व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजेच, मुलांच्या आयुष्यात पालकांचं फार मोठं स्थान असतं. त्यामुळे बच्चेकंपनी कुठेच एकटी फिरत नाहीत. मग कॉफी शॉपमध्ये तरी एकटे कसे येतील, हाच विचार करून कॉफी शॉपच्या मालकांनी बच्चेकंपनीचे पालकही तिथे वेळ व्यस्त राहावेत याकरता सोयी देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा - कॉफी एकदम फेव्हरिट आहे ना मग हे माहित आहे का?
आता कॉफी शॉप म्हटल्यावर स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल हवीच. त्याशिवाय मजा काय? तर, तुम्हाला इथं बर्गर, सँडविच, क्रोइसंट्स, डोनट्स, मिल्कशेक, पिझ्झा, पेस्ट्री आणि इतर बेक पदार्थही इथं मिळतील. असं स्वादिष्ट खाण्यासाठी आणि धम्माल करण्यासाठी पुण्यातील अनेक चिमुकले या कॉफी शॉपला भेट देतात. इकडच्या पदार्थांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पदार्थांची केलेली सजावट. लहान मुलांना कार्टुन्स फार आवडतात. त्यामुळे या पदार्थांकडे मुलांना वळवण्याकरता पदार्थांना कार्टुन्सच्या रचनेप्रमाणे बनवलं जातं. म्हणजे पॉकिमॉन बर्गर तुम्ही पाहिलात की समोर बर्गर आणि पॉकिमॉन असाच विचार तुम्ही करत बसाल.