पुणे : पुणे शहरामध्ये कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३ लाख रुपये किमतीचे १५.६२० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. ही कारवाई ग्रॉफिकॉन आर्केड इमारतीमधील जब्बार ट्रॅव्हल्ससमोरील बसस्टॉपसमोर मंगळवारी दुपारी दोन वाजता करण्यात आली.
मोहन ऊर्फ रोहन मल्लाप्पा गौडगिरी (वय २३ रा. मोजेसवाडी, वडगाव शेरी), गौरव ऊर्फ गोपाल हरीश इस्सार ऊर्फ शर्मा (वय ३५ रा. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत़ त्यांना यापूर्वीदेखील अमली पदार्थाची विक्री करताना अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी आरोपी रोहन गौडगिरी हा ग्रॉफिकॉन आर्केड इमारतीमधील जब्बार ट्रॅव्हल्स समोरील पीएमटी बस स्टॉपसमोर संशयितरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ३ लाख रुपयांचे कोकेन मिळून आले.दोघांना अटक : अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाईच्गौडगिरीकडे केलेल्या सखोल चौकशीत हे कोकेन गौरव शर्मा याने विक्रीसाठी दिले असल्याची माहिती दिली. तसेच गौरव हा खासगी ट्रॅव्हल्सने म्हैसूर येथे जात असल्याची माहिती गौडगिरीने पोलिसांना दिली. ही माहिती अमली विरोधी पथकाने कोल्हापूर पोलिसांना दिली.च्कोल्हापूर पोलिसांनी आरोपी ज्या बसमधून प्रवास करीत होता, ती बस अडवून आरोपीला ताब्यात घेऊन अमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात दिले. आरोपींवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, शर्मा हा पुणे शहर व औरंगाबाद शहर येथे अमली पदार्थाची तस्करी केल्याबद्दल गुन्हे दाखल आहेत़ तर गौडगिरी याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात कोकेन बाळगल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.