पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर शहरातील पब, बार व रेस्टॉरंटमधील बेकायदेशीर व्यवहारांवर उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department Pune) धडक कारवाई केली होती. त्यानंतर मात्र, ही कारवाई थंडबस्त्यात गेली होती. आता फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाची घटना उघडकीस आल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी १७ पथकांची स्थापना केली असून, त्यात ३ विशेष भरारी पथकांचाही समावेश करण्यात आला आहे. या तपासणीत गैरकारभार आढळल्यास परवाने तातडीने निलंबित करण्यात येणार आहेत.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररीत्या मद्य पुरविल्यावरून संबंधित पबचा परवाना निलंबित करण्यात आला. या प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत ६३ पब, बार व रेस्टॉरंटचे परवाने अनिश्चित काळासाठी निलंबित केले होते. त्यानंतर ही कारवाई थंडावली होती. मात्र, गेल्या आठवड्यात फर्ग्युसन रस्त्यावर एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यासाठी १४ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच ३ विशेष पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. या १४ पथकांमध्ये प्रत्येकी ८ जणांचा समावेश करण्यात आला आहे.
या पथकांकडून पुणे व पिंपरीतील सर्व पब, बार व रेस्टॉरंटची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. त्यात या आस्थापना रात्री ठरलेल्या वेळेनंतरही सुरू असतात का, अल्पवयीन मुलांना मद्य दिले जाते का, पब, बारच्या बाहेर मद्याची विक्री केली जाते का, याची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्या पबचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे. पब, बारच्या बाहेर मद्याची विक्री होत असेल, तर त्या पब, बारवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली. या पथकांमार्फत अवैधरीत्या मद्याची विक्री, वाहतूक करण्यासारख्या गुन्ह्यांचा शोध घेण्यात येणार असून, संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर शहरातील १८८ पब, बारवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ६९ पब, बारचे परवाने निलंबित केले आहेत, तर सहा पब, बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित आस्थापनांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून खुलासे मागविले जात आहेत. त्यानंतर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. - चरणसिंह राजपूत, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग.