पुणे: राज्यामध्ये मंगळवारी (दि.३) ढगाळ वातावरण तयार झाल्याने उष्णता जाणवत होती. परिणामी पावसासाठी पोषक हवामान झाले. बऱ्याच जिल्ह्यातील किमान तापमान १७ ते २१ अंशावर नोंदवले गेल्याने थंडी गायब झाली. किमान तापमानातील वाढ ही आणखी काही दिवस कायम राहणार असून, पुढील चार दिवस काही ठिकाणी विजांसह पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने बुधवारी (दि.४) सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला. तसेच गुरुवारी (दि.५) सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा यलो अलर्ट जारी केला. रायगड, नगर, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाजही दिला. तर शुक्रवारी (दि.६) कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये काही भागात विजांसह हलक्या पावसाचा यलो अलर्ट दिला. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुढील ५ दिवस राज्यामध्ये थंडी कमीच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.
पुण्यात गुलाबी थंडी !
पुण्यामध्ये गेल्या आठवड्यात किमान तापमान ९ अंशांपर्यंत गेले होते. त्यानंतर १ डिसेंबर रोजी १३.४ अंश, २ डिसेंबर रोजी १७.४ अंश आणि मंगळवारी (दि.३) २१.७ अंशावर किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुणेकरांना आल्हाददायक वातावरणाचा अनुभव आला. सकाळी गुलाबी थंडीचा आनंद नागरिकांनी घेतला. दुपारी ढगाळ वातावरणामुळे उष्णता जाणवत होती.
राज्यातील कमाल व किमान तापमान
पुणे : ३०.२ - २१.७नगर : २९.० - २२.४
जळगाव : ३१.२ - १८.८कोल्हापूर : २७.५ - २२.३
नाशिक : २९.२ - १७.६सोलापूर : ३०.० - २३.६
मुंबई : ३३.५ - २४.५रत्नागिरी : ३५.२ : २५.४
परभणी : २९.६ : २१.९अकोला : २९.८ : २२.०
नागपूर : २९.४ : २१.४