पुणे : गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार आहे़ पुढील काही दिवसांत शहरातील कमाल तापमान हे ३१ ते ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १० अंशाच्या जवळपास असणार आहे़ त्यामुळे उन्हाळा आणि हिवाळा असे दोन्ही ऋतू पुणेकरांना आणखी काही दिवस अनुभवायला मिळणार आहेत़ दक्षिणेत आलेले चक्रीवादळ आणि त्यानंतर उत्तरेकडील वाऱ्यांचा वाढलेला जोर त्यात मधूनच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या थंडीच्या हंगामात तापमानात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहे़ पुण्यातील कमाल व किमान तापमानावर त्याचा परिणाम झाला असून दिवसा उन्हाचा तडाखा बसत असून रात्री थंडीचा कडाका जाणवत आहे़ देशातील हवामानात बदल झाला, की त्याचा पहिला परिणाम पुण्यातील हवामानात झाल्याचे दिसून येते़ त्यामुळेच इंग्रजांनी सिमला येथील हवामान केंद्र पुण्यात हलविले होते़ हे या हंगामात पुणे शहरात चांगले जाणवले़ सध्या दिवसाचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे़ त्याचवेळी रात्री किमान तापमान गेल्या काही दिवसांत ८ अंशापर्यंत खाली गेले होते़ त्यामुळे दिवसा काही वेळ जरी रस्त्यावर थांबले तरी उन्हाचा तडाखा जाणवत असतो़ मात्र, सायंकाळ झाली की अचानक तापमानात मोठी घट होऊन किमान तापमान १० अंशाच्या खाली जाताना दिसत आहे़ त्यामुळे सकाळी ऊन असल्याने गरम कपडे न घेता घराबाहेर पडणारे जेव्हा रात्री उशिरा घराकडे वळतात तेव्हा त्यांना थंडीचा कडाका जाणवताना दिसत आहे़ सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्यांनाही हा परिणाम जाणवत असतो़ पहाटे फिरायला जाताना कानटोपी, स्वेटर घातले तरी फिरायला जाऊन परत येताना घामाघुम होण्याची पाळी आलेली असते़ थंडीचा कडाका वाढल्याने त्यापासून सरंक्षणासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात होत्या़ त्याचवेळी थंडीचा कडाका कमी झाल्याने शनिवारी रात्री आणि रविवारी ख्रिसमसच्या रात्री तरुणाई मोठ्या संख्येने रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उतरली होती़ एकमेकांना शुभेच्छा देण्यात दंग होते़ (प्रतिनिधी)
दिवसा उन्हाचा तडाखा रात्री थंडीचा कडाका
By admin | Published: December 26, 2016 4:07 AM