पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून (बालभारती) यंदा पहिल्यांदाच पहिली, आठवी व १० वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांना कॉपीराइट लागू करण्यात आला होता. मात्र याला प्रकाशकांकडून खूपच कमी प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत केवळ ५६ प्रकाशकांनी यासाठी नोंदणी केली आहे. विशेषत: क्लासचालकांनी कॉपीराइटच्या निर्णयाला ठेंगा दाखविला आहे.महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात ती उपलब्ध करणे यासाठी १९६७ मध्ये बालभारतीची स्थापना करण्यात आली. गेल्या ५१ वर्षांपासून बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जात आहे. यंदा पहिल्यांदाच बालभारतीकडून १ ली, ८ वी व १० वीच्या सुधारीत अभ्यासक्रमांचा कॉपीराइट घेण्यात आला आहे.प्रकाशकांच्या कॅटेगिरीनुसार कॉपीराइटचे शुल्क प्रति वर्ष प्रति पुस्तक भरणे बंधनकारक आहे. वार्षिक १५ लाख रूपयांपेक्षा कमी टर्नओव्हर असलेल्या प्रकाशकांकडून कॉपीराइटचे कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. ५ कोटीपर्यंत टर्नओव्हर असल्यास १६ हजार, ५ ते १५ कोटी दरम्यान ३१ हजार, २५ कोटीपर्यंत ४७ हजार तर २५ कोटींपेक्षा जास्त टर्नओव्हर असल्यास ६३ हजार रूपये रक्कम प्रकाशकांनी बालभारतीला अदा करणे आवश्यक आहे.अनेक खासगी क्लासचालक आठवी ते बारावीपर्यंतच्या नोट्सची पुस्तके तयार करीत असतात. त्यांनीही कॉपीराइट शुल्क भरणे आवश्यक आहे. १५ लाखापर्यंत टर्नओव्हर असलेल्या क्लासचालकांना यातून सुट आहे, मात्र १५ लाखांपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्या क्लासचालकांनी कॉपीराइटचे शुल्क भरणे बंधनकारक आहे. बालभारतीच्या पुस्तकांची अनेक खासगी प्रकाशने नकल करून गाइड, व्यवसायमाला, स्वअभ्यास, प्रयोगवही आदी स्वरूपांची पुस्तके बाजारात आणतात. ही पुस्तके बाजारात आणल्यावर या खासगी प्रकाशन संस्था त्या त्यांचे कॉपीराइट्स असल्याचा दावा करतात. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील मजकुराचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्याने याचा कॉपीराइट घेण्याचा निर्णय बालभारतीकडून घेण्यात आला. या निर्णयानुसार पाठ्यपुस्तकांमधील पुस्तकातील कोणताही मजूकर वापरायचा असल्यास प्रकाशकांनी बालभारतीची परवानगी घेणे तसेच कॉपीराइटचे शुल्क भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. व्यावसायिक उद्देशाने कोणी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करीत असेल तर बालभारतीला त्यातील आर्थिक हिस्सा मिळणे केव्हाही व्यावहारिक ठरणार असल्याने कॉपीराइट योग्यच असल्याची भूमिका बालभारतीकडून मांडलेली आहे.क्लासेसची संख्या हजारो : मात्र प्रतिसाद कमीचराज्यात ८ वी ते १२ वीपर्यंतचे क्लास घेणारे हजारो क्लासचालक आहेत. त्यांना नोट्सची छपाई करायची असल्यास त्या सर्वांनी बालभारतीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.वार्षिक टर्नओव्हर १५ लाखांपेक्षा कमी असल्यास त्यांना कॉपीराइट शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. मात्र १५ लाखांपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्या क्लासचालकांनी कॉपीराइट शुल्क भरणे बंधनकारक आहे.अशी शेकडो क्लासेस राज्यात आहेत. मात्र बहुतांश क्लासचालकांकडून कॉपीराइट भरण्याला प्रतिसाद दिलेला नाही.व्यावसायिक सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रस्तावही अत्यल्पसध्या बालभारतीच्या पुस्तकांचा आधार घेऊन अनेक खासगी व्यावसायिक कंपन्या शैक्षणिक अॅप अथवा सॉफ्टवेअर तयार करून त्याची बाजारामध्ये विक्री करतात. सध्याच्या काळत अशा सॉफ्टवेअर आणि अॅप्सच्या संख्येत वाढ झाली आहे. या कंपन्यांनाही बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील मजकूर वापरण्यासाठी कॉपीराइट शुल्क भरणे आवश्यक आहे. मात्र या व्यावसायिक सॉफ्टवेअर कंपन्यांकडून खूपच अत्यल्प प्रस्ताव बालभारतीकडे दाखल झाले आहेत.२५ प्रकाशकांनीच भरले शुल्क- बालभारतीच्या या कॉपीराइटला प्रतिसाद देऊन आतपर्यंत फक्त ५६ प्रकाशकांनी नोंदणी केली आहे.त्यापैकी फक्त २५ प्रकाशकांनी शुल्क भरले आहे, उर्वरित ३१ प्रकाशकांनी त्यांचा वार्षिक टर्नओव्हर १५ लाख रूपयांपेक्षा कमी टर्नओव्हर असल्याचे दाखवून कॉपीराइटचे शुल्क भरलेले नाही.
बालभारतीच्या कॉपीराइटला थंड प्रतिसाद ; क्लासचालकांकडून ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 4:55 AM