पुणे : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपापाठोपाठ शिवसेनेमध्येही संघटनात्मक बांधणी सुरु करण्यात आली आहे. त्याकरिता कार्यकर्त्यांना पद देऊन जोडून ठेवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. परंतु, याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होतो की काय अशी स्थिती शहर शिवसेनेत निर्माण झाली आहे. पद वाटपावरुन शिवसेनेमध्ये खदखद सुरु असून निष्ठावंतांंना डावलण्यात आल्याने नाराजीनाट्य सुरु झाले आहे.
शिवसेनेने शहरातील विधानसभानिहाय पदाधिकारी जाहिर केले आहेत. यामध्ये नवीन चेह-यांना संधी देण्यात आली आहे. परंतु, निष्ठावंतांकडून मात्र, भाजपासोबत जवळीक असलेल्यांना पदे देण्यात आलाचा आरोप केला जाऊ लागला आहे. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सुचविलेले बदलही डावलण्यात आले आहेत. सेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी शहर समन्वयक, संघटक, उप शहर संघटक, उप शहर प्रमुख, विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, उपविभाग प्रमुख, प्रभाग प्रमुख, शाखा प्रमुख अशा मतदारसंघ निहाय नवनियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्तांविरुद्ध पक्ष प्रमुखांकडे तक्रार करुन दाद मागणार असणार असल्याचे ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले.===पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते 15 ते 20 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करीत आहेत. प्रत्येक वेळी डावलण्यात येत असल्याने निष्ठावंत असल्याची शिक्षा मिळत असल्याची भावना मनात निर्माण झाल्याचे मत या कार्यकर्त्यांनी नोंदविले.===पक्षात कोणी नाराज नाही. आज शहरात सेनेची बैठक झाली. खासदार संजय राऊत सर्वांशी संवाद साधून गेले आहेत. कोणीही नाराज असल्याबाबत तक्रार केलेली नाही. शहरात सर्व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणि पक्षाविषयी निष्ठा आहे. आगामी पालिका निवडणुकीच्यादृष्टीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे.- संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना