पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या उत्तर भागात तसेच विदर्भात येत्या तीन दिवसांत सौम्य थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले. काही भागांत तापमान १० अंशापेक्षा खाली उतरेल. पुणे शहर तसेच जिल्ह्यातही थंडीचा प्रभाव वाढणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उत्तर प्रदेशापासून उत्तर- मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाची रेषा तयार झाली होती. त्यामुळे उत्तर- मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले. विदर्भाच्या बुलढाण्यामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. आता ही कमी दाबाची रेषा विरली असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढणार आहे, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.
ते म्हणाले, उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे जळगाव, धुळे, नंदूरबार या उत्तर मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भ व उत्तर मराठवाड्यात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होईल. मात्र, थंडीच्या लाटेची शक्यता नाही. लाट येण्यासाठी अनेक ठिकाणी तापमान सरासरी किमान तापमानापेक्षा साडेचार ते साडेसहा अंशांनी उतरणे अपेक्षित असते. सध्या तशी स्थिती दिसत नाही. मात्र, अनेक ठिकाणी तापमान १० अंशांपेक्षा खाली उतरेल.
किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअस
पुणे शहरातही तापमानाचा पारा खाली उतरण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या काही भागात तापमान घसरेल. मात्र, थंडीच्या लाटेची शक्यता नाही, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. पुण्यात गुरुवारी किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.