पुणे : उत्तरेकडून आलेले थंड वारे आणि त्याचवेळी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा संगम झाल्याने एकाचवेळी उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तर, विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस असे चित्र राज्यात दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाबरोबरच थंडगार वारे यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे.
राज्यातील सर्वात किमान तापमान नाशिक येथे ७.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. उत्तर महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्याचवेळी विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. त्याचवेळी कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्यातील परभणी, बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यात मंगळवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी पुढील ३ दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे १२, लोहगाव १३.४, अहमदनगर १२.४, जळगाव ९, कोल्हापूर १६.९, महाबळेश्वर १०.४, मालेगाव १०.२, नाशिक ७.३, सांगली १५.९, सातारा १५, सोलापूर १६.७, मुंबई १५.२, सांताक्रूझ १३.२, अलिबाग १७.५, रत्नागिरी १९.१, पणजी १९.८, डहाणु १५.५, औरंगाबाद ११, अकोला १५.५, अमरावती १५.१, बुलढाणा १२.६, ब्रम्हपूरी १७.५, चंद्रपूर १७.२, गोंदिया १६.८, नागपूर १८.३, वाशिम १२, वर्धा १७.८.