पुणे : उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रातही सोमवारपासून जाणवत असून, ही लाट आणखी दोन दिवस राहणार आहे. मध्य महाराष्ट्राबरोबरच मराठवाडा व विदर्भात पुढील दोन दिवस थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ६.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण, गोवा व मराठवाड्याच्या बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भाच्या काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्याचबरोबर, दिवसाच्या तापमानातही संपूर्ण राज्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका आणखी जाणवत आहे.
वायव्य भारतातून आलेल्या धुळीच्या वादळामुळे गेल्या दोन दिवसांपासून दृश्यमानता कमी झाली होती. त्यात हवामान काेरडे झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम राज्यातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ४ अंशाने घटले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणखी एक दिवस थंडीचा कडाका राहणार असून, विदर्भात पुढील ३ दिवस थंडीची लाट राहणार आहे. २९ जानेवारीनंतर तापमानात वाढ होत जाईल.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ८.५, लोहगाव १०.७, अहमदनगर ७.९, जळगाव ८.६, कोल्हापूर १३.८, महाबळेश्वर ८.८, मालेगाव ८.८, नाशिक ६.३, सांगली १३.५, सातारा १४, सोलापूर ११.२, मुंबई १५.२, सांताक्रुझ १३.४, रत्नागिरी १४.१, पणजी १८.५, डहाणू १३.९, औरंगाबाद ८.८, परभणी १०.८, नांदेड १३.२, अकोला ११, अमरावती १०.८, बुलडाणा ९.२, ब्रह्मपुरी १२.४, चंद्रपूर १३.२, गोंदिया १०.२, नागपूर १०.६, वर्धा ११.५.