पुणे : राज्यामध्ये थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमनात चांगलीच घट झाली असून, त्यामुळे पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यात गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पुढील पाच दिवस किमान-कमाल तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पुण्यात आज एनडीएचे किमान तापमान १० अंशावर नोंदवले गेले. त्यामुळे पुणेकर थंडीने कुडकुडले. तसेच महाबळेश्वरपेक्षाही पुण्याचे तापमान थंड झाले आहे.
सध्या अरबी समुद्रातील कोमोरिन आणि लगतच्या भागात समुद्रसपाटीपासून ०.९ किमी ऊंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर केरळपासून दक्षिण पूर्व अरबी समुद्रातील वाऱ्याची स्थिती समुद्र सपाटीपासून ०.९ किमी वर आहे. देशाच्या उत्तर भागात किमान तापमनात काहीशी घट झाली आहे. देशात बहुतांश ठिकाणी किमान आणि कमाल तापमान १ ते २ अंश सेल्सियसने घसरण झाल्याचे पहायला मिळाले.
गेल्या २४ तासांमध्ये देशात रिज येथे नीचांकी ८.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच राज्यामध्ये पुण्यातच नीचांकी १२.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
पुण्यातील गुरूवारचे किमान तापमान
एनडीए : १०.८
हवेली : ११.१माळीण : ११.४
तळेगाव : ११.५बारामती : ११.८
शिवाजीनगर : १२.२हडपसर : १४.७
कोरेगाव पार्क : १६.६लोणावळा : १६.१
वडगावशेरी : १८.२मगरपट्टा : १८.३
महाराष्ट्रातील किमान तापमानात २३ नोव्हेंबरपासून काही दिवसांपर्यंत हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. २३ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील वाऱ्यांची दिशा बदलणार आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याच्या प्रक्रियेचा परिणाम आणि त्याच्या संभाव्य हालचालीमुळे, २८ नोव्हेंबर दुपार/संध्याकाळपासून पुढील ३-४ दिवसांपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिण/मध्य भागांमध्ये (पुणे देखील) हलक्या पावसाची शक्यता आहे.- डॉ. अनुपम कश्यपी, सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ