पुणे : राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला असून जिल्ह्याच्या विविध भागात बसविण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्र किमान तापमान वेगवेगळे दाखविले असून सर्वात कमी किमान तापमान एनडीए येथील स्वयंचलित हवामान केंद्रात ९.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्याचवेळी शिवाजीनगर येथे ११.३ अंश सेल्सिअस, लोहगाव येथे १२.७ अंश सेल्सिअस तसेच पाषाण येथे ११.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले आहे.
शहर व परिसरात हवामान विभागाने काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी केली आहे. ती प्रामुख्याने प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे. याशिवाय अक्षय मेजरमेंट यांच्या किरकिटवाडी येथे मंगळवारी सकाळी किमान तापमान १०.९ आणि कात्रज येथे ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका जसा वाढला तशी पुण्यातही थंडी वाढली आहे. सायंकाळनंतर थंड वारे वाहण्यास सुरवात होते. त्यामुळे रात्री अनेक ठिकाणी शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. मोकळ्या जागेत व आसपास गर्द झाडी असेल त्या भागात थंडीचे प्रमाण अधिकच जाणवत आहे.
हवामान विभागाच्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्येही त्या त्या भागात किमान तापमान वेगवेगळे नोंदविले गेल्याचे दिसून येते. मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर मंगळवारी सकाळी पुण्यातील विविध भागातील किमान तापमान टिष्ट्वट केले. त्यात शिवाजीनगर ११.२, राजगुरुनगर १०.७, तळेगाव ११.३, एनडीए ९.७, पाषाण ११.८ अंश सेल्सिअस असल्याचे म्हटले आहे.
एनडीए आणि किरकीटवाडी येथे आज अनुक्रमे ९.७ अंश सेल्सिअस आणि १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याचे दाखविण्यात येत आहे. एकाच ठिकाणच्या दोन वेगवेगळ्या नोंदीमुळे तेथे नेमके किती तापमान होते, याविषयी संभ्रम निर्माण होत आहे. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, एनडीए येथे बसविण्यात आलेले स्वयंचलित हवामान केंद्र हे प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी प्रामुख्याने त्याचा उपयोग करण्यात येतो. हवामानाची नोंद करण्यासाठी आयएमडीच्या नियमानुसार जमिनीपासून १.३३ मीटर अथवा ४ फुटावर बसविण्यात आलेल्या थॅमामीटरद्वारे हवामानाची नोंद केली जाते. शिवाजीनगर, लोहगाव आणि पाषाण येथे या सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन व त्याची नियमित देखभाल करुन हवामानाची नोंद केली जाते. त्यामुळे या तीन ठिकाणच्या हवामानाच्या नोंदी अधिकृत समजल्या जातात.