जेजुरी : पुरंदर तालुक्यातील काळदरी खोऱ्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाºया बहिरवाडी येथील एका घराचा पोटमाळा कोसळून एक ८ वर्षांची मुलगी ठार झाली, तर अन्य १३ जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली. श्रावणी कैलास भगत (वय ८) असे या मुलीचे नाव आहे.बहिरवाडी येथील परवा व काल यात्रा होती. यात्रेसाठी कैलास भगत यांचे नातेवाईक गावाला आले होते. रात्री सर्व जण घरात झोपले होते. पहाटे ३.३० च्या सुमारास घरातील पोटमाळा तुळईसह कोसळला. अचानक पोटमाळा कोसळल्याने सर्व जण त्याखाली गाडले गेले. पोटमाळा कोसळल्याच्या आवाजावरून शेजारी जागे झाले. त्यांनी तातडीने घराकडे धाव घेत सर्वांना बाहेर काढले. सर्व जखमींना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात श्रावणी कैलास भगत (वय ८) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोषी विलास भगत (वय ४०), नम्रता विलास भगत (वय १४, दोघी रा. कोथरूड), सारिका कैलास भगत, (वय ३५), श्रेया कैलास भगत (वय १०, दोघी रा. थेरगाव, पुणे) गंभीर जखमी झाले आहेत. विलास किसन भगत (वय ४५, रा. कोथरूड, पुणे), कैलास पांडुरंग भगत (वय ४९), पांडुरंग खंडू भगत, (वय ७०), रखमाबाई पांडुरंग भगत (वय ६५, सर्व रा. थेरगाव, पुणे), सुमन हिरामण सोनवणे (वय ६०, रा. शिंगवे पारगाव), स्वरा अतुल शिंदे (वय ४), मंगल जोरकर (वय ३६), मानसी जोरकर (वय १४), प्रणव संतोष जोरकर (वय ५) जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे आणि गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
बहिरवाडीत घराचा पोटमाळा कोसळून मुलगी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:51 AM