लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पहिल्या व तिसऱ्या लाटेच्या तुलनात्मक अभ्यासावरून पुण्यात कोरोनाची तिसरी लाट येत्या आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ मात्र पुण्यात आजमितीला सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) वाढत असून, लसीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे ही तिसरी लाट आली, तरी पुणे त्यावर यशस्वीरीत्या मात करेल, असे सकारात्मक चित्र शहरात पाहण्यास मिळत आहे़
जागतिक परिस्थिती लक्षात घेतली तर सध्या इराण, इंडोनेशिया, बांगलादेश, स्पेन, दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे़ दुसऱ्या लाटेनंतर या देशांमध्ये १ ते २ महिन्याच्या अंतराने तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली असून, ‘डेल्टा’ कोविड रूग्णांमध्ये येथे वाढ झाली आहे़ पुण्यात मात्र कोरोना विषाणूमधील जनुकीय बदल सध्या पाहण्यास मिळत नसला तरी, लॉकडाऊनमधील शिथिलता, नागरिकांचे स्थलांतर, अद्यापही सर्वांचे न झालेले लसीकरण यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे़ त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन, गर्दी टाळणे, मास्कचा वापर याचे पालन करणे आवश्यक आहे़
परंतु, शहरातील ५० टक्क्यांपर्यंत पोहचलेले लसीकरण व पाच लाखाहून अधिक नागरिकांनी कोरोनावर केलेली मात यामुळे साधारणत: ६० टक्के नागरिकांमध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराविरोधात प्रतिपिंडे (अॅण्टीबॉडीज्) तयार झालेल्या आहेत़ तर दुसरीकडे सरकारी यंत्रणेबरोबरच खाजगी रूग्णालयांमधूनही शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने, पुणे शहरात तिसºया लाटेच्या पूर्वीच मोठ्या प्रमाणात सामुहिक प्रतिकार शक्ती तयार होण्यास मदत होत आहे़ परिणामी तिसरी लाट शहरात आली तरी, त्याचा ती फारशी घातक राहणार नाही असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत बनले आहे़
---------------------------