पुणे : वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना पूर्वपरवानगीशिवाय सामूहिक रजा घेता येणार नाही. त्यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्याकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यानंतरही सोमवारी सर्व प्राध्यापक सामूहिक रजेवर गेल्यास त्यांना त्या दिवशीचे वेतन दिले जाणार नाही, अशी माहिती उच्च शिक्षण विभागाचे पुणे विभागीय सहसंचालक सुनील शेटे यांनी दिली. पुणे विद्यापीठीय शिक्षक संघटना (पुक्टा) व एमपुक्टो या संघटनांनी येत्या सोमवारी सामूहिक रजा घेत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने शिक्षणाविषयी दिलेल्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी राज्य सरकारने करावी, संपकाळातील वेतन देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी त्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलन करण्यावर प्राध्यापक संघटना ठाम आहे. दुसरीकडे पूर्वपरवानगीशिवाय होणारे त्यांचे आंदोलन योग्य नसल्याचे मत शिक्षण संचालनाकडून व्यक्त करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन प्राध्यापकांच्या आंदोलनाबाबत काय भूमिका घेते याकडे संघटनांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
सामूहिक रजा विनावेतन
By admin | Published: December 05, 2014 5:03 AM