पुणे : पुणे शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून घेण्यात आला होता.सुरु करण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. ही कमतरता भरुन काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शहरातील खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ससून रुग्णालयाकडून आलेली डॉक्टरांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालिकेकडे सुपुर्द करण्यात आली. परंतू, यादीमधील सर्वच डॉक्टर परगावी नोकरीला असल्याचे सांगत असल्याने या अधिग्रहणामध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत.
पुणे शहरात कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण वाढत चालले आहेत. या रुग्णांमुळे शहरात आणखी संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचारांसाठी खाटा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण भरती होत आहेत. मनुष्यबळाअभावी याठिकाणी उपचारांमध्ये दिरंगाई होत असून रुग्णांकडे लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. उपलब्ध मनुष्यबळावर रुग्णसेवाचा अतिरिक्त ताण येऊ लागला आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून घेण्यात आला होता. जिल्हाधिकारी या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. संबंधित डॉक्टरांची यादी पालिकेला पाठविण्यात आली. पालिकेकडून संबंधित डॉक्टरांसोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला. सध्या ते करीत असलेले काम आणि नेमणुकीचे ठिकाण याची माहिती घेण्यात आली. बहुतांश डॉक्टरांनी आपण पुण्याबाहेर काम करीत असल्याचे कारण पुढे केले. कोणी मुंबई तर कोणी नागपूर, कोणी ठाणे तर कोणी सातारा अशा ठिकाणी काम करीत असल्याचे सांगण्यात आल्याने या डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे. जर, हे डॉक्टर पुण्यात काम करीत नसतील तर यांची सेवा अधिग्रहीत कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.