पुण्यावर पुन्हा 'देशमुख' राज;जिल्हाधिकारीपदी डाॅ.राजेश देशमुख यांची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 02:08 PM2020-08-17T14:08:25+5:302020-08-17T15:08:07+5:30
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्यापासून देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे घनिष्ठ संबंध निर्माण
पुणे: पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून डाॅ.राजेश देशमुख यांची निवड करण्यात आला आहे. आतापर्यंत पुण्यात तीन देशमुखांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केले असून, राजेश देशमुख हे चौथे देशमुख जिल्हाधिकारी ठरले आहेत. तसेच सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्यापासून देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले आहेत.
आयएएस अधिकारी असलेले डॉ. राजेश देशमुख हे हाफकिन इनस्टिटयटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. 2008 च्या आयएस बॅचचे ते आहेत. डॉ. देशमुख यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदापासून शासकीय सेवेला प्रारंभ केला होता. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देशमुख यांनी काम केले. आयएसएस पदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांना सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाची जबाबदारी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आलेख उंचावत गेला. स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना या योजनांची दखल अवघ्या 14 महिन्यात देशपातळीवर घेतली गेली. याच बरोबर 'कॉटन सिटी' अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्याची देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे कॅपीटल अशी ओळख झाली. मात्र शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्यामुळे २०१८ या एका वर्षात या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा तब्बल १२९ नी कमी झाला आणि डॉ. राजेश देशमुख हे नाव राज्यभर झाले. त्यानंतर हाफकिनचे व्यस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कामाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून त्यांनी देशातील नामांकित असलेल्या पुणे जिल्ह्यात काम करण्याची संधी देशमुख यांना दिली आहे.
नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली झाल्यानंतर गेले काही दिवस पुण्याच्या जिल्हाधिकारी पद हे रिक्त होते. पुणे जिल्हयाचा प्रभारी कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, पुण्यासारख्या महत्वाच्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी पद कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात रिक्त ठेवणे नक्कीच योग्य नव्हते. पण राज्याच्या महाविकास आघाडीत पुणे जिल्हाधिकारीपदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून अनेक खलबतं सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यात राष्ट्रवादीचा पुणे जिल्हा हा बालेकिल्ला असल्याने अजित पवारांचा या नियुक्तीवर वरचष्मा असणार हे जवळपास निश्चित होते. जिल्हाधिकारी पदाच्या शर्यतीत इच्छुक असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या नावांमध्ये राष्ट्रवादीकडून पुढे करण्यात आलेल्या राजेश देशमुख यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे सातारा जिल्हयाचे सीईओ असल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध आहे. आणि अखेर जिल्हाधिकारीपदी म्हणून सोमवारी राजेश देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, या घडीला देशमुख यांच्यासमोर पुण्याला कोरोनाच्या महासंकटातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे