पुणे, दि. 18 : पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली नजिकच्या काळात अपेक्षित असून त्यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी सेल प्रकल्पासाठी बदली केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राव यांच्याकडे पुरंदर विमानतळाचीही जबाबदारी आहे. राव आणि कुणाल कुमार यांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे. दोघांच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुश असल्याने दोघांनाही चांगली पोष्टींग मिळणार असल्याची चर्चा जिल्हधिकारी कार्यालयात सुरू आहे.
फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नागपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेले सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली होती. राव यांनी या पूर्वी सोलापूर आणि नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी काम केलेले आहे. ते गोंदियाच्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरही कार्यरत होते. तसेच वर्धा येथे त्यांनी महसूल खात्यात महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.
तर आॅगस्ट २०१४ मध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त विकास देशमुख यांची राज्य सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून पदोन्नती देऊन बदली केल्यानंतर पुणे महापालिकेच्या रिक्तपदी कुणाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. कुणाल कुमार हे १९९९च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.