नेहा सराफ
पुणे : फनी चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.या भागात अनेक मराठी अधिकारी काम करत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. यातील गंजाम नावाच्या जिल्ह्यात अवघ्या ३६ तासांमध्ये जिल्हा प्रशासनाने तीन लाख लोकांचे स्थलांतर केले. त्यांच्या या नियोजनामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकही जीवितहानीची घटना घडली नाही. इतकेच नव्हे तर वादळ संपल्यावर अवघ्या दोन तासात या जिल्ह्यातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले. यामागे नियोजन होते महाराष्ट्रातील अहमदनगरचे सुपुत्र असलेल्या जिल्हाधिकारी विजय कुलंगे यांचे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फनी हे चक्रीवादळ शुक्रवारी (दि. ३) रोजी ओडिशा किनारपट्टीला धडकले. यावेळी ओडिशा प्रशासनाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. त्यांच्या या नियोजन आणि तात्काळ अंमलबजावणी प्रक्रियेची आखणी अत्यंत काळजीपूर्वक केली गेली. गंजाम जिल्ह्यात ५ तालुके वादळामुळे प्रभावित झाले होते. फनीबाबत हवामानखात्याने पाच दिवस आधी प्रशासनाला कळवले होते. त्यानुसार गंजाममधून नियोजन करून शेवटच्या दीड दिवसात तीन लाख नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले गेले. यातही प्राधान्याने गरोदर महिला,अपंग, वयोवृद्ध यांना हलविण्यात आले. यावेळी ५४० गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यातील १५३ महिलांची तीन तारखेला प्रसूतीही झाली. प्रत्येक स्थलांतर स्थळी अन्न, पाणी, जनरेटर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवली होती. त्याकरिता
आधीच स्थानिक भागातील केटरर्स सेवा देणाऱ्या व्यक्तींशी संपर्क करून ठेवण्यात आला होता. अनेक नागरिक सोबत आपली जनावरे किंवा पाळीव प्राणी घेऊन येत असल्याने त्यांनाही दाखल करून घेण्यात आले. या काळात सर्व माध्यमांचा आधार घेऊन कच्चा घरातून बाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले. शिवाय प्रत्यक्ष वादळाला सुरुवात झाल्यावर कोणीही बाहेर पडू नये असाही प्रचार करण्यात आला. अर्थात याचा फायदा लोकांकडून मिळणाऱ्या सहकार्यात झाल्याचे प्रशासनाने नमूद केले.
वादळाच्या वेळी जिल्ह्याधिकारी रस्त्यावर
प्रत्यक्षात हे वादळ जिल्ह्यात आल्यावर दुलंगे यांनी जीवाची पर्वा न करता थेट किनारपट्टीनजीकच्या महामार्गावर धाव घेतली. रस्त्यावर काही अडचण निर्माण झाल्यास लवकर पोचता यावे यासाठी दोन कॉडलेस फोन, चार ते पाच वेगवेगळे सीम कार्डचे मोबाईल आणि चार कर्मचाऱ्यांसह त्यांनी रस्त्यावर फिरणे पसंत केले. त्यांच्या या साहसाचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे.
विजय कुलंगे, जिल्हाधिकारी गंजाम, ओडिशा : ओडिशात हवामान खात्याचा इशारा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो. कुठल्याही वादळाची शक्यता वर्तवण्यात आली तरी आमची टीम सज्ज होते. याकरिता आधीच प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. यापूर्वी 'तितली' , फायलिन' सारख्या वादळांचा अनुभव असल्याने नागरिक अधिक सजग झाले आहेत.