पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी- चिंचवड विकास प्राधिकरण व जिल्ह्यातील २00९ अगोदरच्या ३0१ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ही कारवाई ३१ मे २0१६ पर्र्यंत करणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उच्च न्यायालयाने राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत कारवाईसाठी कार्यक्रम आखण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या होत्या. त्यानुसार सरकारने हा कार्यक्रम आखला असून, जिल्हा प्रशासनालाही कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. सन २00९ पूर्वीची या परिसरात एकूण १ हजार २३१ अनधिकृत धार्मिक स्थळं आहेत. यात ९२0 धार्मिक स्थळांचे नियमितीकरण, ३0१ स्थळं निष्कासित, तर १0 स्थळांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या अनधिकृत धार्मिक स्थळांना यापूर्वी तीन वेळा संधी दिल्या होत्या. सरकारने सहा महिन्यांच्या आत नियमितीकरण, सहा ते नऊ महिन्यांच्या आत स्थलांतर व दोन वर्षांच्या आत निष्कासित करण्यासाठी मुदत दिली आहे़ या संदर्भात कालपर्यंत बैैठका घेऊन कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, पोलीस व प्रांताधिकाऱ्यांचा अहवाल घेऊन या कारवाईचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यात १ डिसेंबर ते २0 डिसेंबर या कालावधीत प्रारूप यादी तयार करून ती स्थानिक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सन २00९ नंतरच्या धार्मिक स्थळांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यात १५ धार्मिक स्थळं काढून टाकण्यात येणार असून, यावर एका वर्षात कारवाई करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महापालिका आयुक्त, प्राधिकरणाच्या हद्दीतील प्राधिकरण व ग्रामपंचायत हद्दीतील स्थळांवर ग्रामपंचायत कारवाई करणार असल्याचे राव यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
अनधिकृत धार्मिक स्थळे हटविणार : जिल्हाधिकारी
By admin | Published: December 02, 2015 4:13 AM