लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डाॅ. राजेश देशमुख यांनी पदभार स्वीकारला त्यास गुरुवारी (दि. १९) वर्ष पूर्ण होत आहे. कोरोनाच्या संकटकाळात पुण्याचा कार्यभार हाती घेतलेल्या डॉ. देशमुख यांनी या संपूर्ण वर्षात एकही रजा न घेता काम केले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात बदली झाल्यानंतर डॉ. देशमुख पुण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची काळजी डॉ. देशमुख यांनी घेतली. ई-फेरफार, सात-बारा दुरुस्ती, फेरफार अदालत, पाणंद रस्ते असो की तलाठ्यापासून प्रांत अधिकारी सर्वांना कामाला लावले. महसुली कामासोबतच त्यांनी नियमित दर आठवड्याला आढावा बैठका घेऊन वर्षानुवर्षे प्रलंबित पुणे मेट्रोच्या जागेचा, चांदणी चौकाचे रखडलेले भूसंपादन आणि पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसह सर्वात महत्त्वाचे पुणे रिंगरोडसाठी विक्रमी चार महिन्यांत पूर्ण केली.
जिल्ह्यातील कोरोना संकट कमी झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यांपासून ई-फेरफार नोंदीत राज्य बावीसाव्या क्रमांकावरून अकराव्या क्रमांकावर आले. प्रलंबित महसुली नोंदी निर्गत करण्यात पुण्याने राज्यात आघाडी घेतली आहे. पीएम किसान योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेत केंद्र शासनाने डॉ. देशमुख यांचा दिल्लीत गौरव केला. डॉ. देशमुख यांनी सांगितले, “ग्रामीण भागाचा दौरा करताना आजही पाणंद, शेती रस्त्यांच्या खूप अडचणी असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे तातडीने विशेष मोहीम हाती घेतली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागे पडलेले हे काम आता पुन्हा एकदा प्राधान्याने हाती घेणार आहे.”