खडकवासला : सिंहगड रोडवरील नांदेड येथे खडकवासला धरणाच्या मुठा कालव्यात मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरूणाचा बुडुन मृत्यू झाला. रात्री उशिरा त्याचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान मुठा कालव्यात घडलेली आठवड्यातील ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. जयेश रामराव भंडारे ( वय २३ , मूळ राहणार गुरू गोविंदसिंग काॅलेज रोड,इंदिरानगर नाशिक, सध्या राहणार नऱ्हे,) असे कालव्यामध्ये बुडालेल्या तरूणाचे नाव आहे.
जयेश नऱ्हे येथील झील इंजीनियरिंग महाविद्यालयात काॅप्युटर इंजीनियरिंग पदवीचे शिक्षण घेत होता. जयेशच्या मृत्यूने झील इंजीनियरिंग महाविद्यालयाचा आणि वसतिगृह परिसर सून्न झाला असून शोककळा पसरली आहे. पेपर संपल्यामुळे जयेश वसतिगृहातील मित्र तेजस पुरकर,स्वप्निल काळे अक्षय इलाके, नयन कुयवल यांच्या समवेत दुपारी तीनच्या सुमारास नांदेड येथील पाण्याच्या टाकीसमोर कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. पूर्ण क्षमतेने वाहत असलेल्या कालव्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्या तात्काळ पोलीसांना कळवले. हवेली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम यांच्या टीमने आणि नांदेडच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी कालव्यात शोध घेण्याचे काम चालू होते. कालव्यात वाहते पाणी असल्याने त्यांच्या पोहण्याच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर शोध घेउनही रात्री आठ पर्यंत जयेशचा मृतदेह सापडला नव्हता. अग्निशमन दलाचे जवान रात्री उशिरापर्यंत पाणी कमी होण्याची वाटपाहत होते. पाणी कमी झाल्यावर रात्री साडेबारा वाजता अग्निशमन दलाचे जवानांना मृतदेह सापडला. पोलीसांनी उत्तरीय तपासणीसाठी ससून सर्वोपचारी रुग्णालयात पाठवला. अग्निशमन दलाचे प्रमुख. सुजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शरद माने, किशोर काळभोर, महेंद्र देशमुख, पंकज माळी, सुरज शिंदे. शिंदे यांनी शोधकार्य मोहिमेत सहभागी झाले होते.
वडीलांना बसला धक्काजयेशचे वडील नाशीक येथे खसगी कंपनीत कामाला आहेत.घटनेचे वृत्त समजताच ते रात्री घटनास्थळी पोहचले. जयेश त्यांचा एकुलता एक मुलगा. शिकून मोठे व्हवे अशी त्यांची इच्छा होती त्याच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसला आहे.