पुणे : कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (College of Engineering Pune- COEP)ला स्वतंत्र (एकल) विद्यापीठाचा दर्जा देण्यास गुरुवारी विधानसभा व विधान परिषदेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सीओईपीच्या नियामक मंडळाच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले आहे. आता या पुढील काळात विद्यापीठाच्या माध्यमातून उद्योगांना बरोबर घेऊन नवनवीन व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे शक्य होणार आहे.
सीओईपीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा, याबाबतचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाला सादर करण्यात आला होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सीओईपीला हा दर्जा मिळू शकला नाही. त्यामुळे सीओईपीला एकल विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. त्यासाठी नवे धोरण व स्वतंत्र कायदा तयार केला गेला. विधी व न्याय विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर गुरुवारी अधिवेशनात त्यास मंजुरी देण्यात आली.
सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा म्हणाले, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, प्रधान संचालक विकास रस्तोगी, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक अभय वाघ आणि सीओईपीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या प्रयत्नामुळे सीओईपीला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनचे आम्हा सर्वांचे स्वप्न साकार होत आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम राबवणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे विविध औद्योगिक कंपन्यांशी सहकार्य करार करून नवनवीन अभ्यासक्रम सुरू करता येतील. तसेच स्वत:ची पदवी देता येईल. विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्याने संशोधनाला चालना मिळणार आहे. देशातील विविध शैक्षणिक संस्थांशी व परदेशी विद्यापीठाबरोबर एकत्रपणे संशोधन करता येईल, असेही आहुजा यांनी सांगितले.
सीओईपीला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांवर वाढीव शुल्काचा भार पडणार नाही, याबाबत काळजी घेतली जाईल. शासन मंजूर अभ्यासक्रमांशिवाय विद्यापीठातर्फे नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील. त्यासाठीचा खर्च सीओईपीला प्राप्त होणाऱ्या निधीतून करावा लागेल.
- डॉ. बी.बी. आहुजा, संचालक, सीओईपी