पुणे: दुचाकी घसरून महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई- बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात घडली. अपघातात दुचाकीवरील दोन तरुणी जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तेजल संजय चांडक (२३, सध्या रा. कर्वेनगर, मूळ रा. मोतीनगर, पुसद) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी अनुष्का बसप्पा घाडगे आणि जॅकलिन मारिया जेकब जखमी झाल्या
आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वारजे पोलिसांनी दिली. दुचाकीस्वार तेजल, अनुष्का, जॅकलिन व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रम करत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास दुचाकीस्वार तेजल ही अनुष्का, जॅकलिन यांच्यासह दुचाकीवरून बाह्यवळण मार्गावरून जात होत्या. वारजे भागातील डुक्करखिंड परिसरात तेजलचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. अपघातात तेजलच्या डोक्याला दुखापत झाली तसेच दुचाकीवरील मैत्रिणी अनुष्का, जॅकलिन गंभीर जखमी झाल्या.