पुणे/लष्कर : दिवसेंदिवस शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी (दि. २४) कोरेगाव पार्कपोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव पार्कपोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात पीडित तरुणी शिक्षण घेत आहे. याच महाविद्यालयात आरोपी ११वी, १२वीचे शिक्षण घेत आहेत. त्यातील एकाने पीडितेला पार्टीसाठी म्हणून आरोपींपैकी एकाच्या फ्लॅटवर नेले. तेथे गेल्यावर आरोपींनी ड्रगचे सेवन केले आणि पीडितेवर बलात्कार केला. घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेतली.
मोदींच्या दौऱ्यामुळे चुप्पी
यासंदर्भात ‘लोकमत’ने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असल्याने पोलिसांनी या प्रकरणी चुप्पी साधल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाविद्यालयाच्या ट्रस्टींची आरोपींना मारहाण
घडलेल्या प्रकाराची माहिती संबंधित नामांकित महाविद्यालयाच्या ट्रस्टींना देण्यात आली. यानंतर त्यांनी या प्रकरणातील आरोपींना बोलावून मारहाण केली. तसेच हा गुन्हा दाखल होऊ नये, यासाठीदेखील प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘लोकमत’चे प्रश्न...
- एवढी मोठी घटना घडलेली असताना, पोलिसांकडून चुप्पी का?- या प्रकरणातील नामांकित महाविद्यालय प्रशासनाकडून राजकारण्यांमार्फत पोलिसांवर दबाव तर नाही ना?- या प्रकरणातील आरोपी बड्या बापाची मुले तर नाहीत ना?- पीडितेला आता न्याय कसा मिळणार?