राहुल शिंदे
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाने सुमारे २ महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत ऑनलाइनशिक्षणासाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार केल्याची घोषणा केली. मात्र, विद्यापीठाशी संलग्न सुमारे १ हजाराहून अधिक महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांपैकी केवळ १४ महाविद्यालयांकडूनच या ऑनलाईन व्यासपीठाचा वापर केला जात आहे. त्यामुळे इतर संलग्न महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या या व्यासपीठाकडे पाठ फिरवली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसह इतरही विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता यावे, यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र व्यासपीठ तयार केले. कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये दुर्गम भागात सुध्दा विद्यार्थ्यांना ऑनलाइन व डाऊन केलेले व्हिडिओ नंतर ऑफलाइन पद्धतीने पाहता येतील या दृष्टीने या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली. प्रथमतः ग्रामीण व शहरी भागातील 14 संलग्न महाविद्यालयांमध्ये या व्यासपीठाच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर एकाही नवीन महाविद्यालयाला या व्यासपीठाचा वापर करणे शक्य झाले नाही. विद्यापीठाच्या या ऑनलाईन व्यासपीठाचा वापर करण्यासाठी पुणे ,अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यातील आणखी १५ महाविद्यालायांनी विद्यापीठाकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न १ हजार महाविद्यालयांपैकी सप्टेंबर महिना अखेरपर्यंत केवळ ३० महाविद्यालयांनाच या व्यासपीठाचा वापर करता येईल.त्यामुळे विद्यापीठाने तयार केलेली ऑनलाइन शिक्षणाची सुविधा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलीच नाही तर निर्मिती करून त्याचा उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये विद्यापीठाने तयार केलेल्या या ऑनलाईन व्यासपीठाबाबत चर्चा करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाबाबत येणाऱ्या अडचणींसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
विद्यापीठाचे सर्व अधिकारी सध्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तयारीच्या नियोजनात अडकून पडले आहेत. त्यामुळे कोणालाही ऑनलाइन शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ पनाही. विद्यापीठाने तयार केलेली यंत्रणा महाविद्यालयापर्यंत न पोहोचल्याने संलग्न महाविद्यालयांनी झूम, गुगल मीट सारख्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने तयार केलेल्या यंत्रणेचा सर्वांना उपयोग होणार आहे की निवडक महाविद्यालयांपूरती ही यंत्रणा सिमीत राहणार आहे, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात केले जात आहे.------------------------------------ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या तक्रारीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत करण्यात आला होता.विद्यापीठाने हा कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे. जर कक्ष स्थापन झाला नसेल तर याबाबत पाठपुरावा केल्या जाईल.- राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ