राहुल शिंदे पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली काही महाविद्यालये विद्यापीठाची मान्यता नसलेल्या प्राचार्यांकडून चालवली जात आहेत. त्यात प्राचार्यपद हे एकाकी असल्याने खुल्या संवर्गातून भरण्यात यावे यासाठी न्यायालयात जाणाºया मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वाडिया महाविद्यालयाचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ महाविद्यलायाचेच नाही तर विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयांपैकी एक म्हणून मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नौरोसजी वाडिया कॉलेजकडे पाहिले जाते. परंतु, गेल्या चार वर्षांहून अधिक कालावधीपासून प्रभारी प्राचार्यांकडून या महाविद्यालयाचे कामकाज केले जात आहे. विद्यापीठाने वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दोन वर्षे प्रभारी प्राचार्यपदासाठी मान्यता दिली होती. त्यानंतर प्रभारी प्राचार्यांची मान्यता नाकारली. मात्र, सुमारे तीन वर्षांपासून विद्यापीठची मान्यता नसणाºया व्यक्तीकडून विद्यालयाचे आर्थिक व शैक्षणिक व्यवहार चालविले जात आहेत. त्यावर राज्याच्या उच्च शिक्षण विभागासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आक्षेप घेतले. तरीही संस्थेने त्याची फारशी दखल घेतली नाही. परिणामी विद्यापीठाची मान्यता नसलेल्या अध्यापकाच्या स्वाक्षरीने विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे होणारा प्रशासकीय व वित्तीय बाबींचा पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही, असे पत्र सहसंचालक कार्यालयातर्फे मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सचिवांना पाठविण्यात आले.विद्यापीठाने दोन वर्षे प्रभारी प्राचार्यांना मान्यता देऊन त्यानुसार सर्व शैक्षणिक व आर्थिक कामकाज सुरू ठेवले. मात्र, प्राचार्यपद भरण्याबाबत हालचाली केल्या जात नसल्याने विद्यापीठाकडून दिल्या जाणाºया विविध मान्यता थांबविण्यात आल्या. विद्यापीठातर्फे सुमारे तीन वर्षांपासून या महाविद्यालयाच्या नवीन तुकड्यांना, विषयांना, अभ्यासक्रमांना, संशोधन केंद्रांना तसेच प्रयोगशाळांना मान्यता दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. नौरोसजी वाडिया महाविद्यालयच्या प्रभारी प्राचार्य पदाची जबाबदारी सध्या डॉ. के. एस. व्यंकटराघवन यांच्याकडे आहे. परंतु, आमच्या दृष्टीने व्यंकटराघवन हे प्राचार्य नाहीत, असे विद्यापीठातील अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्याकडून सध्या आर्थिक व शैक्षणिक व्यवहार केले जात आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पूर्णवेळ प्राचार्य व प्राध्यापक नसलेल्या महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला. हाच नियम वाडिया कॉलेजलासुद्धा लागू होतो. परंतु, विद्यापीठाने यासंदर्भात कार्यवाही केल्याचे नाही. सध्या नवीन तुकड्या व अभ्यासक्रमांना मान्यता न देण्याचे विद्यापीठाचे धोरण आहे.
मान्यता नसलेले प्राचार्य चालवतायेत कॉलेज,नोरोसजी वाडिया महाविद्यालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:36 AM