राज्यातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले. मात्र, विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास राज्य शासनाकडून परवानगी दिली जात नसल्याने राज्याच्या उच्च शिक्षण विभागावर टीका झाली. मात्र, १५ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे सोमवारपासून शहरातील बहुतांश महाविद्यालयांमधील वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. महाविद्यालय प्रशासनाने राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करून महाविद्यालयात ऑफलाईन वर्ग भरण्याबाबतची तयारी केली आहे.
----------
राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार येत्या सोमवारपासून ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत महाविद्यालय ऑफलाइन पद्धतीने सुरू केले जाणार आहे. महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी कोरोनाविषयक आवश्यक खबरदारी घेतील, याकडे कटाक्षाने दिले जाईल.
- डॉ. संजय खरात, प्राचार्य, माॅडर्न कॉलेज, गणेशखिंड
------------------------
महाविद्यालयातर्फे सध्या ऑनलाइन पद्धतीने वर्ग घेण्याबाबत नियोजन केले आहे. सोमवारी ऑनलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांचे वर्ग होतील. परंतु,विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके ऑफलाइन पद्धतीने सुरू होतील. पुढील आठवड्यात एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष वर्ग भरविले जातील.
- डॉ. प्रवीणसिंह परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन कॉलेज
----------
कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून विद्यापीठातील विभागांमध्ये सोमवारपासून ऑफलाइन पद्धतीने शिकवण्यास सुरुवात केली जाणार आहे. विभागातील विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्यात अडचण येणार नाही. मात्र, सध्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार नाही; त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ