पुण्यात आज काॅलेज सुरु होणार आहेत. पण सगळ्याच विद्यार्थ्यांना मात्र काॅलेजचा पहिल्या दिवसाचा आनंद घेता येणार नाहीये. कोरोनाचे नियम पाळून महाविद्यालये सुरु करायची असल्याने पुण्यातल्या अनेक महाविद्यालयांनी काॅलेज आत्ताच सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार आज पासून काॅलेज पुन्हा सुरु होत आहेत. कोरोना मुळे वर्षभर बंद असलेली महाविद्यालये पुन्हा सुरु होणार आहेत. त्यामुळे काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागताची खास तयारी देखील करण्यात आली आहे. महाविद्यालय तसेच विद्यापीठाच्या गेटवर विद्यार्थ्यांचे फुले देवून स्वागत केले जाणार आहे. पण सगळ्या विद्यार्थ्यांना मात्र हा आनंद घेता येणार नाही.
पुणे विद्यापीठाशी संलग्न १००० काॅलेज आहेत. पुणे शहरात आर्ट्स, काॅमर्स, आर्किटेक्चर इंजिनिअरींग या शाखांचे साधारण ३९९ काॅलेज आहेत. मात्र यातले ५०% काॅलेज सुरु होतील अशी शक्यता आहे
अनेक नामांकित महाविद्यालयांनी मात्र लगेच महाविद्यालये सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे कोव्हीडचे नियम पाळायचे असल्याने पुण्यातल्या फर्ग्युसन काॅलेज ने फक्त प्रॅक्टिकल्स सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. १०००० विद्यार्थी संख्या असल्याने एकदम इतके विद्यार्थी मॅनेज करणं अवघड असल्याने आठवडा भराने लेक्चर सुरु करण्याबाबत निर्णय होईल असे या महाविद्यालयाच्या मॅनेजमेंटचे म्हणणे आहे.