पुण्यात सुरू होणारी महाविद्यालये पुन्हा बंद होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 07:03 PM2021-10-12T19:03:44+5:302021-10-12T19:12:25+5:30
पुणे : गेल्या दीड वर्षानंतर पुण्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली होती. त्यानंतर ...
पुणे: गेल्या दीड वर्षानंतर पुण्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली होती. त्यानंतर महाविद्यालये सुरू केल्यावर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात लसीकरण देण्याची सोयही उपलब्ध केली जाईल, असे पुणे महापालिकेने सांगितले होते. त्यामुळे मंगळवारी पुण्यातील महाविद्यालये सुरू होतील अशी अपेक्षा होती. मात्र काही महाविद्यालयांचा अपवाद वगळता बहुतांश सर्व महाविद्यालये बंद असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच महाविद्यालये सुरू होतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. यामुळे आता सुरू होणारी ही महाविद्यालये पुन्हा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लेखी आदेशाविना महाविद्यालये कशी उघडायची?
महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्याच्या उच्च शिक्षण विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अद्याप महाविद्यालयांना कोणतीही लेखी सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महाविद्यालयांकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसते. शासनाकडून लेखी आदेश प्रसिध्द केल्यानंतरच महाविद्यालये सुरू होतील, असे विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.
विद्यापीठाची भूमिका-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यातील कोरोना स्थिती सुधारत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालये काही निर्बंधासह सुरू करण्यास परवानगी जाहीर झालेली आहे ही आनंदाची बाब आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या व शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येत असून महाविद्यालये पूर्वतयारी करीत आहेत. अहमदनगर, नाशिक तसेच पुणे ग्रामीण क्षेत्रात देखील परवानगी बाबत संबधित सक्षम प्राधिकरणाशी विचार विमर्श सुरू असून वस्तीगृहाबाबत देखील पूर्वतयारी सुरू आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांची संख्या विचारात घेता सुरक्षिततेला प्राधान्य देत टप्प्या टप्प्याने प्रक्रिया राबविणे संदर्भात राज्य शासन व उच्च शिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.