पुणे: राज्यातील महाविद्यालये उद्यापासून (20 ऑक्टोबरपासून) सुरू होत आहेत. सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठासह (Savitribai Phule Pune University) बहुतांश विद्यापीठांनी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत सुस्पष्टता नसल्यामुळे विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयांनी सविस्तर नियमावलीची मागणी केली आहे.
मुंबई विद्यापीठाअंर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये एकावेळेला 50 टक्के विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येणार आहे. कोरोना प्रतिबंध लशीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. कोल्हापूर विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये लशीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच येता येणार आहे. सोलापूर विद्यापीठाची नियमावलीही जाहीर झाली आहे. या विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये फक्त प्रात्यक्षिके होणार आहेत. प्रत्यक्ष वर्ग न भरवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
राज्यातील इतर विद्यापीठांनीही त्यांची नियमावली जाहीर केली आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश दिले होते पण लेखी आदेश नसल्याने अनेक महाविद्यालये बंदच असल्याचे दिसले होते. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठे 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू होतील अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली होती.