पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या प्रांगणातील छताला खंडांतर्गत स्थलांतरीत स्विफ्टलेट (अॅमेबिल) पक्ष्यांनी वसाहत तयार केली आहे. त्यामध्ये ५० हून जास्त पक्ष्यांनी घरटी साकारली आहेत. या पक्ष्यांच्या किलबिलाटाने येथून येणाऱ्या - जाणारांना कुतूहलाचे वातावरण निर्मान झाले आहे. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील तावदाणात प्रवेश करताच घिरट्या मारून किलबिलाट करणाऱ्या लहान आकारातील पक्ष्यांकडे सर्वांचे लक्ष आपसूकच वेधले जात आहे. लांब शेपटी, काळसर डोके, पाठीचा पंखाचा भाग गडद निळा व वेगळी चमक असणारा, तसेच गळ्यापासून पोटाचा सर्व भाग पांढरा अशा वैशिष्ट्यांचा हा पक्षी आहे. या पक्ष्यांनी छताच्या कोपऱ्यांमध्ये चिखल मातीपासून ही अधांतरी दिसणारी घरटी तयार केली आहेत. महिन्यापासून ही घरटी तयार करण्यासाठी या पक्ष्यांची लगबग सुरू होती. आता ही घरटी तयार होऊन वसाहतच तयार झाली आहे. त्यामध्ये पक्ष्यांची ये - जा सतत सुरू असल्याने महापालिकेत कामानिमित्त येणारे अनेकजण कुतूहलाने या पक्ष्यांच्या हालचालींचे निरीक्षण करताना रमून गेल्याचे दिसून येते. एव्हाणा लोकवस्तीत या पक्ष्यांची घरटी आढळत नाहीत. मात्र अनेक जणांनी अशाप्रकारची पक्ष्यांची घरटी प्रथमच पाहिल्याने त्यांना याचे अप्रूप वाटल्याखेरीज राहत नाही. आफ्रिका खंडात विशेषत्वाने आढळणाऱ्या या पक्ष्यांची महाराष्ट्रात ‘वायर टेल्ड स्वॅलो’ (मराठी नाव : तार वाली पाकोळी) आणि ‘कॉमन इंडियन स्वॅलो’ या प्रजाती आढळतात. याच प्रजातीने येथे वसाहत तयार केली आहे. हा पक्षी बहुदा शेकडो, हजारोच्या थव्यांमध्ये वावरताना आढळून येत आहे. पूर्वी कठीण डोंगरकडा, कपारी, तसेच पडून राहिलेल्या दगडखाणींच्या सरळ भिंतींच्या खोबणीत घरटी करून हे पक्षी मोठ्या प्रमाणात वास्तव्य करताना आढळायचे. मात्र आता शहरी भागातही त्यांची वस्तीस्थाने दिसू लागली आहेत. याबाबत पक्षी अभ्यासक महेश महाजण म्हणाले,‘‘ हा पक्षी थंड हवामान असलेल्या भागात अंशकालीन स्थलांतर करीत असतो. गवताळ मैदाने तसेच पाणवठ्यांवरील हवेत उडणारे किटक हे त्याचे मुख्य खाद्य असून पंखांच्या खास रचनेमुळे घिरट्या घेत किटक पकण्यात ते तरबेज आहेत. बहुदा निशाचर असणाऱ्या या पक्षाचे १० वर्षाचे आयुष्य आहे. हा पक्षी १ ते २ अंडी देतो.’’(प्रतिनिधी)
‘स्विफ्टलेट’ पक्ष्यांच्या वसाहतीचे कुतूहल
By admin | Published: November 19, 2014 4:28 AM