पुणे : इयत्ता दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळे शहरातील बहुतेक शाळांमध्ये शनिवारी रंगले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शाळेतील शिक्षक व इतर विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाळा व मित्र-मैत्रिणींचा निरोप घेताना काही विद्यार्थी भावुकही झाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावीचा निकाल दि. १३ जून रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला होता. या निकालाची मूळ गुणपत्रिका शनिवारी दुपारी तीन वाजल्यानंतर सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळाली. त्यासाठी शाळांमध्ये दहावीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका घेण्यासाठी शाळांमध्ये गर्दी केली होती. बहुतेक शाळांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यानिमित्त वर्गातील सर्व मित्र-मैत्रिणींच्याही गाठी-भेठी झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. विद्यार्थ्यांना या वेळी कलचाचणी अहवालाचेही वाटप करण्यात आले.अहिल्यादेवी प्रशालेमध्ये दहावीच्या मुलींनी एकत्र येत एकच जल्लोष केला. शाळेतील टॉपर ठरलेल्या विद्यार्थिनीला मैत्रिणींनी उचलून घेत आनंद व्यक्त केला. या वेळी यशस्वी मुलींना शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न गर्ल्स हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका सुजाता तांबे, उपमुख्याध्यापिका माया नाईक, पर्यवेक्षिका अनिता बसाळे यांच्यासह इतर शिक्षक या वेळी उपस्थित होते. शाळेचा एकूण निकाल ९५.८४ टक्के लागला असून सृष्टी कुटे ही ९६.६० टक्के गुण मिळवून पहिली आली आहे. प्रियांका येवले, गौरी मोने, आकांक्षा किरवे आणि मीनल निम्हण यांनी पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले आहे.आंबेगाव बु. येथील अभिनव एज्युकेश्न सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळेतही गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रंगला. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचा एकूण निकाल ९९.६४ टक्के लागला असून अभिजित पाटील हा ९५ टक्के गुणांसह प्रथम आला आहे. संस्थापक-अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. वारजे माळवाडी येथील स्मिता पाटील शाळेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भक्ती काकतकर, ममता चौधरी आणि गायत्री पडिले या विद्यार्थिनींना गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक एस. आर. पाटील, मुख्याध्यापक संतोष तनपुरे आदी उपस्थित होते.
शाळांमध्ये रंगला कौतुक सोहळा
By admin | Published: June 25, 2017 5:06 AM