निवडणुकीच्या प्रचारात भरला जातोय धर्मपंथाचा रंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 12:02 PM2019-04-12T12:02:12+5:302019-04-12T12:03:27+5:30
राजस्थानी, कन्नड, बांगला भाषिकांबरोबरच पारशी, मुस्लिम, ओबीसी अशा विविध समाज घटकांचे स्वतंत्र मेळावे भरवून मतदान करण्याचे आवाहन कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने केले जात आहे..
पुणे : निवडणुक काळामध्ये प्रत्येक पक्ष आपण निधर्मी असल्याचा दावा करीत असला तरी, प्रत्यक्ष प्राचारात मात्र विविध समाजघटक डोळ्यांसमोर ठेऊन सुरु असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. देशभरातून विविध धर्मीय आणि भाषा बोलणाऱ्या व्यक्ती शहरात वास्तव्यास असल्याने राजस्थानी, कन्नड, बांगला भाषिकांबरोबरच पारशी, मुस्लिम, ओबीसी अशा विविध समाज घटकांचे स्वतंत्र मेळावे भरवून मतदान करण्याचे आवाहन कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने केले जात आहे. याशिवाय कामगार आणि विविध संघटनांचे मेळावे देखील आयोजित केले जात आहेत.
मुस्लिम राष्ट्रीय मंच, राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची फळी यामाध्यमातून भारतीय जनता पार्टीचा विविध घटकांच्या लहानसहान सभा, मेळावे घेण्याकडे कल आहे. आझम कॅम्पस येथे शाहनवाझ हुसेन यांच्या उपस्थितीत नुकताच मेळावा घेण्यात आला. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे पुणे संयोजक अली दारुवाला यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. येत्या सोमवारी (दि. १५) शहरातील निवडक पारशी समाजातील व्यक्तींशी भाजपाचे उमेदवार गिरीष बापट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे संवाद साधणार आहेत. लष्कर भागातील न्यू क्लब येथे सायंकाळी ७ वाजता हा मेळावा होईल. या मेळाव्यास पारशी समाजातील रयान माजदा, खुशरु बरुचा, बर्जेन इराणी, रुषाद बरुचा, रुस्तमजी जिजीभॉय अशा मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी मेमण खोजा ईस्माइली समाजातील व्यक्तींशी देखील बापट संवाद साधतील.
कॉंग्रेस पक्ष देखील यात मागे नाही. कॉंग्रेसने नुकताच बिबवेवाडी येथे राजस्थान येथील समस्त जालोर सिरोही प्रवासी बंधुंचा मेळावा घेतला. या बैठकीत राजस्थानचे वनमंत्री सुखराम बिष्णोई, जालोर सुरोही मतदार संघाचे कॉंग्रेसचे उमेदवार रतन देवासी देखील उपस्थित होते. लोकशाहीवादी संघटनांची देखील बैठक बोलावण्यात आली होती. त्यात लोकायत, कम्युनिस्ट पक्ष, फुले शहू आंबेडकर विचार मंच, राष्ट्रसेवा दल, भीम आर्मी, संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुस्लिम, कन्नड, ओबीसी, दलित, जैन, ख्रिश्चन अशा विविध संघटनांच्या व्यक्तींशी देखील संवाद साधला जाणार असल्याचे कॉंग्रेसच्या प्रतिनिधींनी सांगितले. कॉंग्रेसने कामगार मेळावा घेत, मतदानाचे आवाहन केले आहे.
पक्ष कोणताही विचारधारा असणारा असला तरी, प्रत्यक्ष राजकारण करताना विविध समाजघटकांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करीत त्यांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. संख्येने अल्प, अत्यल्प असले तरी सर्वच समाज घटक आपल्या सोबत रहावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी त्या समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींना पाचारण केले जात आहे. अगदी परराज्यातील नेत्यांनाही संवाद साधण्यासाठी बोलावण्यात येत आहे.