लोकमत न्यूज नेटवर्कखोडद : शिक्षण म्हणावे तर कलेच्या मानाने अवघे जेमतेम... कलेच्या संदर्भातील कोणतीही पदवी नाही... नशिबी मात्र गावोगावी फिरत उदरनिर्वाह करणे, हीच त्या कलेची काय ती शिदोरी... तीच शिदोरी जपत जिल्हा परिषदेच्या शाळांना मात्र वेगळ्या उंचीवर नेत शाळेच्या सौंदर्यात व पयार्याने विद्यार्थ्यांच्या भावविश्वात, ज्ञानात व त्यांच्या गुणवत्तेत रंग भरण्याचे काम गिरधारी भागवत कांबळे हा तरुण करीत आहे.गिरधारी भागवत कांबळे ऊर्फ पेंटर बाबू हा तरुण मूळचा लातूरचा राहणारा. या तरुणाला पुढे शिकण्याची तीव्र इच्छा असतानादेखील केवळ घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने १०वीमधूनच शाळेचा निरोप घ्यावा लागला आणि कुटुंबाच्या जबाबदारीचा गाडा ओढायला सुरुवात केली.विद्यार्थिदशेत असतानाच चित्रकलेची प्रचंड आवड होती; पण या कलेला पुढे वाव मिळावा, असे शिक्षण मिळाले नसल्याने भविष्यात हीच कला आपल्याला जीवन जगायला शिकवेल, असे तरी या तरुणाला वाटले नव्हते! शाळा सोडल्यानंतर मात्र याच कलेला आपला श्वास मानून गिरधारी कांबळे याने जीव ओतून या कलेचा ध्यास घेतला. २००४ पासून त्याच्या या कलेच्या माध्यमातून त्याचा नवीन जीवनप्रवास सुरू झाला. राज्यात सर्व शिक्षा अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात ‘पेन्सिलवर बसलेला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी’ यांना साकारण्याचे काम पहिल्यांदा या तरुणाला मिळाले.
‘तो’ भरतोय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात रंग
By admin | Published: May 13, 2017 4:17 AM