पुणे : महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत १८, १९ व २० असे तीन प्रभाग आहेत. त्यासाठी मतदानाची सर्व प्रक्रिया सोमवारी रात्री पूर्ण करण्यात आली. मंगळवारी सकाळी ७ वाजता मॉक पोल घेऊन त्यानंतर साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यात येईल.निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी ही माहिती दिली. तिन्ही प्रभागांतील नगरसेवकपदाच्या एकूण १२ जागांसाठी मिळून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह १११ उमेदवार आहेत. मतदानासाठी एकूण २३५ मतदान केंदे्र आहेत. १ हजार १७५ कर्मचारी या केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडतील. सुमारे १५० कर्मचारी राखीव म्हणून ठेवण्यात आले आहेत.एकूण मतदान केंद्रांमध्ये ६ पेक्षा जास्त मतदान केंद्रे आहेत अशा १३ इमारती आहेत. त्या संवेदनशील समजून तिथे जास्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याशिवाय या सर्व केंद्रांमध्ये बाहेरच्या बाजूला व प्रत्यक्ष मतदान कक्षातही सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांची मतदान केंद्रे ताब्यात घेतली असून मंगळवारी सकाळी ७ वाजता पोलिंग एजंटच्या उपस्थितीत मॉक पोल (मतदानाची रंगीत तालीम) घेण्यात येईल. त्यानंतर मतदानप्रक्रिया सुरू होईल, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी) प्रत्येक उमेदवाराचा प्रत्येक केंद्रावर एक मतदान प्रतिनिधी (पोलिंग एजंट) राहिला असता तर उमेदवारांची संख्या लक्षात घेता मतदान केंद्रावर पोलिंग एजंटची गर्दी झाली असती. त्यामुळे निवडणूक शाखेच्या वतीने राजकीय पक्षांना प्रभागातील त्यांच्या पक्षाच्या सर्व गटातील उमेदवारांसाठी एकच पोलिंग एजंट द्यावा असे सुचवण्यात आले. ते मान्य झाल्यामुळे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात केंद्रे जास्त असली तरी पोलिंग एजंटची संख्या कमी झाली आहे.
कर्मचाऱ्यांसाठी मतदानाची रंगीत तालीम
By admin | Published: February 21, 2017 3:26 AM