पुणे : लष्करी संशोधनामध्ये स्वदेशीच्या जागरातील एक लढवय्या कार्यकर्ता, देशाभिमानी असा लौकिक मिळविलेले, पुण्यासह अनेक ठिकाणी देशप्रेमाविषयी व्याख्याने देणारे पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली अटक झाली. त्यामुळे शेकडो जणांना धक्का बसला आहे. पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत राष्ट्रप्रेमाचे धडे घेणारे कुरुलकर हे अशा ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेच कसे याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
प्रदीप कुरुलकर यांचा जन्म १९६३ मध्ये झाला. त्यांनी १९८५ मध्ये सीओईपी पुणे येथून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बी. ई पदवी विशेष श्रेणीत प्राप्त केली. त्यांनी प्रगत पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम आयआयटी कानपूरमधून पूर्ण केला. क्षेपणास्त्र प्रक्षेपकांची रचना आणि विकास, लष्करी अभियांत्रिकी गियर, अत्याधुनिक रोबोटिक्स आणि लष्करी अनुप्रयोगांसाठी मोबाइल मानवरहित प्रणाली हे त्यांचे कौशल्याचे क्षेत्र आहेत. भारतीय लष्करी संशोधनामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. आकाश, अग्नि, ब्रम्होस्त्र या क्षेपणास्त्राच्या संशोधन व विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. त्याचवेळी त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अगदी जवळचा संबंध आहे.
याबाबत त्यांनी आपण संघ शाखेत जात होतो. त्यांचा मुलगा सध्या जर्मनीत आहे. आपला मुलगाही आता संघकार्यात जातो. आजोबा प्रभात शाखेत जात, अशी माहिती त्यांनी नूमवीय या युट्यूब चॅनलला एका मुलाखतीत दाेन वर्षांपूर्वी दिली होती. आपल्या घरात धार्मिक वातावरण होते. श्रावणात गीता पाठ म्हणण्याचा दंडक होता. राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याबरोबरही त्यांनी अनेक अनुभव सांगितले.
पुण्यातील एका कलामहोत्सवात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी शस्त्रास्त्रविषयक संशोधन आणि निर्मिती क्षेत्रातील कृती दलात काम करताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सहवासाचा परिसस्पर्श लाभला. त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो,' अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.
डीआरडीओच्या थिंक टॅंकमधील एक
ज्या संस्थेचे संचालक असताना त्यांना अटक करण्यात आली. त्याच संस्थेत त्यांची सर्वप्रथम मुलाखत झाली होती. ४ जानेवारी १९८७ मध्ये ते ‘डीआरडीओ’मध्ये रूजू झाले. ‘डीआरडीओ’च्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केल्यानंतर त्यांची १९९० मध्ये पुण्यात नियुक्ती झाली. २००२-२००८ मध्ये त्यांनी पुण्यात संरक्षण दलाची लॅब सुरू केली. ‘डीआरडीओ’च्या देशभरातील ५३ संस्थांमध्ये ५ हजार ७०० हून अधिक शास्त्रज्ञ काम करतात. त्यांच्यातील ‘थिंक टँक’ म्हणून १० जणांची निवड केली जाते. त्याला ‘जी फास्ट’ असे म्हटले जाते. प्रदीप कुरुलकर यांची त्या १० जणांमध्ये निवड झाली होती. पश्चिम भागातील ते एकमेव होते.
पुण्यातील अनेक कार्यक्रमात ते सहभागी होत. त्यावेळी अब्दुल कलाम यांची आठवण नेहमी सांगत. आपण शस्त्रात्र निर्मितीमध्ये इतके पारंगत झाले पाहिजे की, कोणत्याही देशाने वर तोंड करून पाहिले नाही पाहिजे. त्यासाठीचे संशोधन करण्याचे काम डीआरडीओने करावे, असे कलाम यांचे सांगणे असल्याचे कुरुलकर सांगत असत. असा देशप्रेमाने भारलेला शास्त्रज्ञ पाकिस्तानच्या जाळ्यात कसा अडकला, याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
प्रदीप कुरुलकर हे भारतीय संगीताचे अभ्यासक आहेत. त्यांचे वडील अनेक वाद्य वाजवत असत. संघाच्या घोष विभागातही ते होते. श्रीनिवासन या कानडी संघाच्या कार्यकर्त्यांचा हात धरून आपण मोतीबागेत गेल्याचे त्यांनी सांगितले. ते चांगली बासरी वाजवत तसेच हार्मोनियम, सेक्सोफोन छान वाजवत असत. त्यांच्या मुलाचे सर्व शिक्षण इंग्रजी शाळेत झाले; परंतु, आजही त्यांचा मुलगा चांगले आणि शुद्ध मराठी बोलतो. त्याला कारणही प्रदीप कुरुलकर प्रमुख कारण ठरले. दोघा पती-पत्नीने घरात नेहमी मराठीमध्ये बोलण्याचा आग्रह धरला. संघ प्रचारकांच्या ॲड. बाबा भिडे बैठका घेत. या बैठकांचे टिपणे काढण्याचे काम प्रदीप कुरुलकर यांनी केले होते. ‘नुमवी’च्या अनेक आठवणी त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितल्या.