पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (mpsc) आयोजित केली जाणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा -2021 येत्या 26 फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर एकूण 666 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे एमपीएससीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीतर्फे विविध परीक्षा पढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता आयोगातर्फे सामान्य प्रशासन विभागातील 100 सहाय्यक कक्ष अधिकारी पदांसाठी गट ब वर्गाची परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच वित्त विभागातील 190 राज्य कर निरिक्षक पदांची आणि गृह विभागातील 376 पोलीस उपनिरिक्षक पदांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, आयोगातर्फे 4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या गट ब दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेतली जाणार आहे. मुख्य परीक्षा संयुक्त परीक्षा पेपर 1 येत्या 22 जानेवारी 2022 रोजी तर पोलीस उपनिरिक्षक पेपर-2 येत्या 29 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहायक कक्ष अधिकारी पेपर-2 येत्या 5 फेब्रुवारी रोजी तर राज्य कर निरिक्षक पेपर -2 येत्या 12 फेब्रुवारी रोजी घेतला जाणार आहे.