पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांनी शहरातील सराइतांची झाडाझडती घेत मध्यरात्री राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सराइतांची चौकशी करण्यात आली. यामध्ये पोलिस दफ्तरी नोंद असलेल्या ३ हजार ६८३ सराइतांपैकी ७०९ सराइत राहत्या पत्त्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आहे. तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ३७ जणांना अटक करण्यात आली असून, त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सराइतांकडून २७ कोयते, चाकू, कुऱ्हाडी, तलवारी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांना रोखण्याबरोबरच शहरातील सराइत गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, संदीप सिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर आणि गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबविली. या कारवाईत पोलिसांनी गुन्हेगार वास्तव्यास असलेल्या ठिकाणांची पाहणी केली.पोलिस दफ्तरी नोंद असलेल्या तीन हजार ६८३ सराइतांपैकी ७०९ सराइत राहत्या पत्त्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गंभीर गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपींना अटक केली. खंडणी विरोधी पथकाने शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात छापा टाकून सुरेश किसन कलाधर (वय ५९, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) याच्याकडून चार लाख २२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. कोंढव्यातील एका हुक्का पार्लरवर छापा टाकून हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा हुक्का पार्लर चालविल्याप्रकरणी हॉटेल मालक प्रकाशसिंग नरसिंग चौहान (वय ३९) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी शहरातील लॉज, हॉटेल्सची तपासणी केली.
मार्केटयार्ड भागात गांजा विक्री केल्याप्रकरणी चाँद शेख याला अटक केली. त्याच्याकडून एक किलो ९३० ग्रॅम गांजा, दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोंढवा भागात असीफ अतीक मेनन (वय २२) याला गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आली. त्याच्याकडून ५९७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी केली.