पुणे : शहरात कोंबिंग ऑपरेशनद्वारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे, त्यानुसार शहरातील वेगवेगळ्या भागात गुरूवार (दि. ८) आणि शुक्रवार (दि.९) दरम्यान २४९ गुन्हेगारांची तपासणी करून ६६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अपर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) यांना शहरात कोंबिग आॅपरेशन करून गुन्हेगारांची पाहाणी करून त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून २८ हजार रूपयांचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. तर आर्म अँक्टच्या ४/२५ प्रमाणे एकूण ५० आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून ३६ कोयते, २ पालघन, ७ तलवार, २ सत्तूर, २ चाकू असा एकूण १२ हजार २२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय तडीपार आदेशाचा भंग करीत शहरात वास्तव्य करणा-या ९ तडीपारांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये सुधीर ऊर्फ गट्या चंद्रकांत गवस (रा.येरवडा), लक्ष्मीकांत ऊर्फ लक्या सूर्यकांत जावळे (रा. मंगळवार पेठ) , अजरूददीन ऊर्फ अज्जू मेहबुब शेख (रा. हडपसर), खुशाल ऊर्फ दाद्या संतोष शिंदे (रा. अप्पर बिबवेवाडी), मनोज अरूण पांडागळे (रा.कोंढवा), प्रेम अंकुश शिंदे ( रा.आंबेगाव), सर्फराज ऊर्फ डर समीर शेख (रा.गंज पेठ), योगेश बाबूराव पाटणे (रा. कसबा पेठ), शुभम राजेश भोसले (रा.कसबा पेठ) यांचा समावेश आहे. तसेच एनडीपीसी अँक्टनुसार दोन आरोपींना अटक करून १ किलो ५०० ग्रँम गांजा असा एकूण ४० हजार रूपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोणी कंदमधील पाहिजे आरोपी सागर बाळू धोत्रे (रा,वाघोली) याला ताब्यात घेण्यात आले आहे. युनिट २ च्या गुन्हे शाखेने दोन टोळ्यांमधील १० आरोपी अटक करून त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूढील काळातही कोंबिग आॅपरेशन राबविण्यात येणार असून, गुन्हेगारांच्या हालचालींवर कडक नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
--------------------------------------------