पुणे : भीमा-कोरेगाव विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणेपोलिसांकडून बुधवारी रात्री सराइताची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत ४ हजार ९१ गुन्हेगारांची झाडाझडती केली असता ८४१ मिळून आले.
शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यानुसार स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेतील विविध पथकांनी बुधवारी रात्री ९ ते पहाटे २ वाजेपर्यंत सर्च मोहीम राबवून ८४१ गुन्हेगारांंना अटक केली. त्याशिवाय बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ३८ जणांना अटक करून त्यांच्याकडून ४० कोयते, चार तलवारी, तीन सत्तूर असा शस्त्रसाठा जप्त केला. सिंहगड रोड व येरवडा येथे दोघांकडून २ रिव्हाॅल्व्हर जप्त करण्यात आले.
अमली पदार्थविरोधी पथकाने मेफेड्रॉन तस्कराला अटक करून १० लाख ७६ हजारांचा एमडी जप्त केले. गावठी दारूविक्रीप्रकरणी ४६ केसेस करून ४८ हजारांचा दारूसाठा जप्त केला. सीआरपीसी कायद्यानुसार ७६ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. जामिनावर कारागृहातून सुटून आलेल्या आरोपींनाही नोटीस देण्यात आली.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, उपायुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त सुहैल शर्मा, उपायुक्त, शशिकांत बोराटे, उपायुक्त विक्रांत देशमुख, वाहतूक उपायुक्त विजय मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.