पुणे : चीनमधून परतलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना काही खासगी कंपन्यांकडून कोरोना विषाणुची लागण झाली नसल्याचे प्रमाणपत्र मागितले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या तक्रारी काही कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाकडे केल्या आहेत. तसेच काही कंपन्यांकडून संबंधित कर्मचाऱ्यांयांबाबत नेमकी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात विचारणाही केली जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे.चीनमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भारतातून शिक्षण, नोकरी, व्यवसाय अन्य कारणांसाठी चीनमध्ये गेलेले बहुतेक जण भारतात परतू लागले आहे. मागील महिनाभरात अनेक भारतीयांनी चीन सोडले आहे. कंपनीच्या कामानिमित्त चीनमध्ये काही कर्मचारी चीनमध्ये जाऊन आले आहेत. आधीच कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या या कर्मचाऱ्यांना आता कंपन्यांकडून कार्यालयात येण्यास मनाई केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत एका कर्मचाºयाने आरोग्य विभागाकडे यासंदर्भात तक्रारही केली आहे. त्यांच्या कंपनीने कोरोना विषाणुची लागण झाली नसल्याचे प्रमाणपत्र रुग्णालयाकडून आणण्यास सांगितले आहे. त्या कर्मचाºयाला कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही कंपनीकडून हे प्रमाणपत्र मागितले आहे. कंपन्यांकडून दक्षता म्हणून हे पाऊल उचलले जात आहे.याविषयी माहिती देताना आरोग्य विभागातील राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, चीनमधून आलेल्या कर्मचाऱ्यांना हा अनुभव येत आहे. काही जणांनी याबाबत आरोग्य विभागाकडे विचारणाही केली आहे. कंपन्यांकडूनही या कर्मचाऱ्यांसंदर्भात कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती घेतली जात आहे. चीनमधून परतलेल्या कर्मचाºयांना कोणतीही लक्षणे नसल्यास भितीचे कारण नाही. मात्र, संबंधितांनी किमान चौदा दिवस घरीच राहून काळजी घेणे आवश्यक आहे. पण एवढ्या दिवस कंपनीकडून सुट्टी घेतल्यास नोकरीवर परिणाम होऊ शकतो, या भितीने संबंधित कर्मचारी कंपनीत रुजू होण्यासाठी जात आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र दिले जात नाही. चौदा दिवसांची पगारी रजा द्यावीचीनमधून परतलेल्यांना किमान चौदा दिवस घरातच राहून काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी असतील तर त्यांना चीनमधून परतल्यापासून किमान चौदा दिवसांची पगारी रजा देण्यात यावी. त्यांच्याकडून कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र मागण्यात येऊ नये. गोपनीयतेच्या कारणास्तव असे प्रमाणपत्र दिले जात आहे.- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग
चीनमधून आलाय ?'; आधी 'कोरोना' नसल्याचे प्रमाणपत्र द्या, मगचं कामावर या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 9:23 AM