पुणे : महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधांचा लाभ घेत, नागरिकांनी पाचव्या दिवशी बाप्पांचे फिरत्या हौद, संकलन केंद, लाेंखंडी टाकीत, बांधलेल्या हौदात एकूण १५ हजार ८३८ गणेश मुर्तींचे विसर्जन केले. दरम्यान महापालिकेच्या विसर्जन हौद, संकलन केंद्र आदी यंत्रणेव्दारे ३१ सप्टेंबर ते २ सप्टेंबरपर्यंत जमा झालेल्या २७ हजार ३७५ गणेश मुर्तींचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने वाघोली येथील खाणीमध्ये विसर्जन केले आहे.
शहरात पाचव्या दिवशी विसर्जन होणाऱ्या घरच्या गणपतींची संख्याही मोठी आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने शहरात १५० फिरते हौद कार्यरत केले होते. याबरोबरच नदी घाट परिसरात लोखंडी टाक्या, बांधलेल्या टाक्यांबरोबरच सुरक्षा रक्षक, जीव रक्षक, होडी व नदीत गणेश विसर्जन करण्यासाठी सेवक वर्गही उपलब्ध करून दिला होता. रविवारी म्हणजेच पाचव्या दिवशी महापालिकेने बांधलेल्या हौदात २ हजार ९५७, लोखंडी टाक्यात ८ हजार ५७४, मूर्ती संकलन केंद्रावर २ हजार ३१५ व फिरत्या हौदात १ हजार ९९२ गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. ही एकूण संख्या १५ हजार ८३८ इतकी आहे. तर रविवारी शहरात १९ हजार ७५३ किलो निर्माल्यही जमा झाले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.