पुणे : भरगर्दीत पोलिस निरीक्षकावर गोळीबार झाल्यानंतर पुणेरेल्वे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. तसे येथून प्रवास करणाऱ्या माणसाच्या मनात भीती आहे. पिस्तुल किंवा अन्य शस्त्रास्त्रे घेऊन स्थानकातून कोणालाही ये-जा करता येत असल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे स्थानकात तब्बल ३० ठिकाणांहून प्रवेश करता येतो. तर सध्या स्थानकात असलेले दोन मेटल डिटेक्टर आणि एक स्कॅनर मागील काही दिवसांपासून बंद आहेत. घटनेच्या दोन दिवसांनंतर शुक्रवारीही रेल्वे प्रशासन सुस्त असल्याचे दिसून आले. वडगावशेरीतील एका महिलेचा खून केल्यानंतर आरोपी पुणे रेल्वे स्थानकातून झेलम एक्स्प्रेसने दिल्ली येथे पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन आरोपी झेलम एक्सप्रेसने पळून जात असताना त्यांना पोलीस पकडण्यासाठी गेले असताना शिवलाल राव याने गोळीबार करुन पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना जखमी केले व ते पळून गेले होते. हा थरार बुधवारी सायंकाळी रेल्वे स्थानकातच भर गर्दीच्या वेळी घडल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी दोघाही आरोपींना जेरबंद केले. मात्र, या प्रकारामुळे रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण हे करताना सुरक्षेबाबत मात्र कसलीही काळजी घेतली जात नाही. सध्या फलाट क्रमांक एकवर प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावर दोन मेटल डिटेक्टर दिसतात. तसेच एक स्कॅनरही अनेक वर्षांपासून आहे. पण सध्यातरी दोन्ही उपकरणे बंद असल्याने केवळ बुजगावणे ठरत आहेत. मेटल डिटेक्टर सुरू असतानाही त्याचा उपयोग होत नाही. ज्याठिकाणी डिटेक्टर बसविण्यात आले आहेत, त्याच्या आजू-बाजूनेही प्रवाशांना आत जाता येते. तर केवळ एकच स्कॅनर असल्याने तिथेही सर्व प्रवाशांच्या सामानाची तपासणी करणे अशक्यप्राय आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी तब्बल ३० ठिकाणे आहेत. या सर्व ठिकाणी स्कॅनर किंवा मेटल डिटेक्टर बसविणे शक्य नाही. फलाट क्रमांक एक तसेच अन्य फलाटांवर जाण्यासाठी इतर मार्गांवर कोणत्याही प्रकारची सुरक्षाविषयक काळजी घेतली जात नाही. कोणीही प्रवासी कोणतीही वस्तु किंवा शस्त्रास्त्रे घेऊन स्थानकातून प्रवेश करू शकतो. पोलिसांकडूनही तपासणी केली जात नसल्याचे प्रवाशांनी सांगितले................पोलिस निरीक्षकावर स्थानकात गोळीबार झाल्यानंतरही रेल्वे प्रशासन सुस्त असल्याचे शुक्रवार दिसून आले. बंद मेटल डिटेक्टर व स्कॅनर सुरू करण्याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. दोन्ही उपकरणे शुक्रवारी जागेवर बंद अवस्थेत उभी होती. स्कॅनर शेजारी दोन-तीन पोलिस बसलेले दिसून आले. बॅरीकेट्स लावून स्कॅनरलाच सुरक्षा पुरविण्यात आल्याचे पाहायला मिळाले. इतर प्रवेशद्वारांवरही पोलिसांची गस्त किंवा इतर उपाययोजना दिसून आल्या नाहीत. याबाबत अधिकारीही बोलण्यास तयार नाहीत. रेल्वे स्थानकावरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह आहे. प्रवाशांची तपासणी होत नाही. सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत रेल्वे प्रशासन कमी पडत आहे. स्कॅनरचा फक्त दिखाऊपणा आहे.- श्रीकांत जाधव, प्रवासी....................स्थानकात जिथे स्कॅनर किंवा मेटल डिटेक्टर आहेत, तिथे पोलिस लक्ष देत नाहीत. प्रवासी त्याच्या बाजून सामान घेऊन जात असतात. त्यामुळे त्याचा काहीच उपयोग होत नाही.- दिनेश नाईक, प्रवासी
आओ जाओ घर तुम्हारा : पुणे रेल्वे प्रशासन सुस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 11:28 AM
पिस्तुल किंवा अन्य शस्त्रास्त्रे घेऊन रेल्वे स्थानकातून कोणालाही ये-जा करता येत असल्याचे भरगर्दीत पोलीस निरीक्षकावर गोळीबार झाल्यानंतर स्पष्ट झाले.
ठळक मुद्देमेटल डिटेक्टर, स्कॅनर बंद, अधिकाऱ्यांची स्थिती रेल्वे स्थानकात तब्बल ३० ठिकाणांहून प्रवेश करता येतो. सध्या फलाट क्रमांक एकवर प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावर दोन मेटल डिटेक्टर दिसतात