आता तरी भानावर या; संघटना बांधा : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:15 PM2019-07-19T12:15:04+5:302019-07-19T12:16:42+5:30
आता तरी संघटनेकडे लक्ष देऊन समाजाच्या सर्व थरात जाऊन त्यांना आपलेसे करा..
पुणे: शहरातील, जिल्ह्यातील व राज्यातीलही स्थिती चांगली नाही, तरीही त्यांना यश मिळाले, याचे कारण पदाधिकाऱ्यांचे जनतेत मिसळणे व संघटनेची बांधणी हेच आहे. ते लक्षात घ्या व आता तरी संघटनेकडे लक्ष देऊन समाजाच्या सर्व थरात जाऊन त्यांना आपलेसे करा अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान पिळले. शहर कार्यकारिणीच्या बैठकीली गैरहजर असलेल्या नगरसेवकांना नोटीस बजावण्याचा व त्यांच्याकडून खुलासा मागवण्याचा आदेश त्यांनी पालिकेतील विरोधी पक्षनेत्यांना दिला.
शहर व जिल्हा कार्यकारिणीची बैठक पवार यांनी गुरूवारी दुपारी घेतली. शहराच्या बैठकीत त्यांनी पुण्यातील सर्व राजकीय स्थितीची माहिती घेतली. महापालिकेत बजबजपुरी माजली आहे. आपल्या नगरसेवकांनी ती जनतेसमोर सातत्याने आणली पाहिजे. संघटनेनेही त्यांना साथ देत बूथ कमिट्या स्थापन करणे, त्यात सर्वांना स्थान देणे, मतदार यादीनुसार काम करणे या गोष्टी केल्या पाहिजेत. त्या होताना दिसत नाही म्हणून पवार यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुकीत पराभव होत असतो, मात्र त्यामुळे खचून न जाता नव्या शक्तीने उभे रहायचे असते असे त्यांनी शहराच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सांगितले.
शहराध्यक्ष चेतन तुपे, पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, तसेच नगरसेवक, पदाधिकारी, पक्षाचे आजी, माजी आमदार, खासदार बैठकीला उपस्थित होते. प्रास्तविक तुपे यांनी केले. बैठकीत कोणाही नेत्याला बोलू न देता पवार यांनी कार्यकर्त्यांनाच बोलायची संधी दिली. त्यांच्याकडून त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून माहितीही घेतली. बैठकीचा समारोपही पवार यांनीच केला.
......
संघटनेचे महत्व सांगताना पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले. तीन मतदान केंद्रांचा अपवाद वगळता संपुर्ण बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनाच मताधिक्य असल्याचे त्यांनी सांगितले व संघटनेमुळेच हे शक्य झाल्याचेही स्पष्ट केले. यापुढे बूथ कमिट्यांना महत्व देऊन मतदारयादीप्रमाणे त्यांची रचना करण्याची सुचना त्यांनी केली.