जेजुरी : जेजुरीच्या मार्तंड देव संस्थान विश्वस्त निवडी च्या विरोधात जेजुरीकरांचे आंदोलन वेगवेगळ्या पातळीवरून पुढे नेण्याचा आंदोलकांचा प्रयत्न असून आज आंदोलक व ग्रामस्थांनी सकाळी या निवडी विरोधात घंटानाद करून निषेध केला. कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार असून आंदोलन आणखीन जोर धरू लागले आहे.
दरम्यान, ग्रामस्थांच्या या आंदोलनांचा पाचवा दिवस असून राजकीय पक्ष संघटना तसेच सत्ताधारी व विरोधी राजकीय नेत्यांचा ही पाठींबा मिळू लागला आहे. आज सकाळी येथील उघडा मारुती मित्र मंडळाच्या वतीने अध्यक्ष सचिन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद करीत तसेच नवीन विश्वस्त निवडीचा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करावा. येथील रूढी परंपरांची माहिती असणाऱ्या स्थानिकांना संधी द्यायला हवी होती. मात्र राजकीय दबावाला बळी पडून त्यांनी बाहेरच्या लोकांना संधी दिली. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. त्यांच्या वर्षातील आठ यात्रा, वेगवेगळे धार्मिक विधी, मानपान, रूढी परंपरा जपण्यासाठी विश्वस्त स्थानिकच असायला हवेत असे मंडळाचे अध्यक्ष सचिन सोनवणे यांनी सांगितले.
दरम्यान, आज पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांची दुपारी चार वाजता भेटण्याची वेळ घेऊन त्यांना ग्रामस्थांचे निवेदन देण्यासाठी सुमारे ५० वाहनांतून दोनशे कार्यकर्ते पुण्याला रवाना झाले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतानाच पुण्याचे धर्मादाय आयुक्तांना ही ग्रामस्थ भेटून या निवडीचा पुनर्विचार करावा म्हनून निवेदन देणार आहेत. ग्रामस्थांच्या विनंतीचा शासकीय पातळीवरून योग्य ती दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढवण्याचा ग्रामस्थांनी यावेळी निर्धार व्यक्त केला आहे