पुणे : शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका इराणी विद्यार्थ्याला स्वतःचे भविष्य पाहणे चांगलेच महागात पडले. भविष्य समजले नाही. मात्र, चाकू आणि फायटरने मारहाण करत चोरट्यांनी त्याच्या मोबाइलच्या ॲपवरून ९५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्स्फर करून घेतले. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी, मुस्तबा अकबर अरेबियन (३०, रा. नेरळ रोड, कोरेगाव पार्क) याने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी, अरेबियन हा शैक्षणिक व्हिसावर पुण्यात वास्तव्यास आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा आरोपींसोबत परिचय झाला होता. त्यानुसार ते कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये भेटले. मात्र, भविष्य सांगणाऱ्या आरोपींनी येथे फार गोंगाट आहे, असे म्हणून अरेबियनला कारमध्ये बसवून ते लेन क्रमांक सहामध्ये आले. तेथे त्यांनी अरेबियन याला चाकू आणि फायटरचा धाक दाखवून हाताने मराहाण करत त्याच्या पेटीएममधून ९५ हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गाडे करत आहेत.